Satara Phaltan Doctor Death Case: महिला डॉक्टर, पोलिसांच्या परस्पर तक्रारी; फॉरेन्सिक टीम तळ ठोकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:40 IST2025-10-25T12:39:39+5:302025-10-25T12:40:37+5:30
Satara Phaltan Women Doctor Death Case: पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक गुन्हा दाखल केला

Satara Phaltan Doctor Death Case: महिला डॉक्टर, पोलिसांच्या परस्पर तक्रारी; फॉरेन्सिक टीम तळ ठोकून
Satara Crime: फलटण तालुक्यात महिला सरकारी डॉक्टरच्या तळहातावर सुसाइड नोट आहे. त्यात फलटण ग्रामीणचा पोलिस उपनिरीक्षक व अन्य एक अशा दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मानसिक व शारीरिक त्रास व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. तसेच, उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवार रात्री उघडकीस आला. डॉक्टरच्या मृतदेहावर शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. त्याठिकाणी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.
पोलिस अधीक्षक दोशी म्हणाले, संबंधित डॉक्टरने फलटण शहरातील हॉटेलची रूम बुक केली होती. रूम बंद असल्याने व फोनही लागत नसल्याने हॉटेल व्यवस्थापनाने बनावट चावीने दरवाजा उघडल्यानंतर ही घटना समोर आली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक गुन्हा दाखल केला. नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी 'आम्ही घटनास्थळी पोहोचत नाही, तोपर्यंत पंचनामा करू नका', अशी मागणी केली. यानंतर रात्री तीनच्या सुमारास पंचनामा करण्यात आला.
यावेळी महिलेच्या तळहातावर सुसाइड नोट आढळली. घटनास्थळी पेनही आढळले आहे. पोलिसांनी त्या हॉटेलचा तीन दिवसांचा डीव्हीआर घेतला आहे. महिलेच्या तळहातावरील सुसाइड नोटनुसार आत्महत्या आणि अत्याचाराचा गुन्हा फलटण शहर पोलिसांत दाखल करण्यात आला असून, फलटण शहर पोलिस तपास करत आहेत. तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणार असल्याचेही दोशी नमूद केले.
महिला डॉक्टर, पोलिसांच्या परस्पर तक्रारी
पोलिसांना सोईस्कर अशी वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकला जात होता काय, असा प्रश्न माध्यमांनी केला असता तुषार दोशी म्हणाले, महिला डॉक्टरने तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पोलिसांविराेधात तक्रार केली होती.
त्याचप्रमाणे पोलिसांनीही जिल्हा शल्यचिकित्सकांकडे महिलेच्या विरोधात तक्रार केली होती. या दोन्ही गोष्टींचा काही संबंध नसावा, मात्र, गुन्हा दाखल केला आहे. ही आत्महत्याच आहे काय आणि आत्महत्या असेल, तर त्यामागील कारणे काय, याचा शोध घेतल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असे दोशी यांनी सांगितले.
फॉरेन्सिक टीम रात्रीपासून तळ ठोकून
फलटण शहरात ज्या ठिकाणी घटना घडली, तेथे फॉरेन्सिक टीम रात्रीपासून तळ ठोकून आहे. तपास योग्य रीतीने सुरू असून, तांत्रिक बाजूही तपासून घेतल्या जात असल्याचे दोशी यांनी सांगितले.