Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 20:47 IST2025-10-29T20:46:51+5:302025-10-29T20:47:57+5:30
Phaltan Doctor News: फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकरला फोटो पाठवले होते. त्यात शेवटचा फोटो छताला लटकलेल्या ओढणीसह होता.

Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
Phaltan Doctor Case in Marathi: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात पोलिसांना नवीन माहिती मिळाली आहे. ज्या रात्री डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली, त्यापूर्वी तिने प्रशांत बनकरला फोटो पाठवले होते. त्यात एक फोटो गळफास केलेल्या ओढणीचाही होता.
फलटणमधील हॉटेल मधुदीप एका खोलीत डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेहच सापडला. डॉक्टर तरुणीच्या मृत्यूचा पोलीस वेगवेगळ्या अंगाने तपास करत असून आता तिने पाठवलेला शेवटचा फोटोही मिळाला आहे.
प्रशांत बनकरच्या मोबाईलमध्ये मिळाले फोटो
प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरुणी यांच्यात घरी वाद झाला होता. त्यानंतर तरुणी हॉटेल मधुदीपमध्ये आली. हॉटेलमधील रुममध्ये आल्यानंतर तिने प्रशांत बनकरला मेसेज केले होते. फोटो पाठवले होते. या फोटोमध्ये डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकवलेल्या ओढणीसह सेल्फी पाठवला होता.
प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केलेली आहे. तो पोलीस कोठडीत असून, पोलिसांनी त्याचा मोबाइलही ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी केल्यानंतर त्यात डॉक्टर तरुणीने पाठवलेले फोटो मिळाले आहेत. त्याचबरोबर प्रशांतसोबतचे मेसेजही पोलिसांना मिळाले आहेत.
गोपाळ बदनेचा मोबाइलही मिळाला
या प्रकरणात अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने मोबाईल लपवला होता. तो मोबाइलही पोलिसांना मिळाला आहे. गोपाळ बदने फरार झाला होता. नंतर तो पोलिसांना शरण आला, पण त्याच्याजवळ मोबाईल नव्हता. त्याचा एक नातेवाईक मोबाईल घेऊन फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला.