Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:08 IST2025-10-27T13:07:01+5:302025-10-27T13:08:51+5:30
Phaltan Doctor News: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात नवा दावा केला गेला आहे. दीपाली निंबाळकर आत्महत्या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला गेला, त्यासाठी डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला गेला होता, असे मयत महिलेच्या आईने म्हटले आहे.

Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
Phaltan Doctor News Marathi: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. डॉक्टर तरुणीकडून तक्रारीत पोस्टपार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा उल्लेख होता. आता भाग्यश्री पांचगण या महिलेने धक्कादायक दावा केला आहे. माझ्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, पण त्यावर डॉक्टर तरुणीची सही होती. तिच्यावर बनावट पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी दबाव टाकला गेला होता, असा दावा भाग्यश्री पांचगणे यांनी केला आहे. त्यामुळे दीपाली निंबाळकर मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे.
सातारा जिल्ह्यातीलच भाग्यश्री मारुती पांचगणे या महिलेने डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणानंतर हा दावा केला आहे. भाग्यश्री पांचगणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझी मुलगी दीपाली हिचे लष्करात अधिकारी असलेल्या अजिंक्य हनुमंत निंबाळकर यांच्याशी लग्न झाले होते. १७ ऑगस्ट रोजी माझ्या जावयाने मला सांगितले की, दीपालीची प्रकृती गंभीर आहे. तिला फलटण येथील राऊत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
सहा महिन्यांची गर्भवती, दीपालीने केली आत्महत्या
"दीपाली सहा महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे आम्हाला वाटले की, ती आजारी असेल. १९ ऑगस्ट रोजी आम्हाला आमच्या मुलीने आत्महत्या केल्याचे कळले. आम्ही रुग्णालयात गेलो. तिथे आम्हाल्या सांगण्यात आले की, दीपाली आत्महत्या केली आहे", असा खळबळजनक दावा भाग्यश्री पांचगणे यांनी केला.
"तिने आत्महत्या केल्याचे आम्हाला सांगितले गेले, पण मला पूर्ण खात्री आहे की तिची हत्या करण्यात आली. तिचा नवरा आणि सासरचे सतत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. तिला वारंवार मारहाण केली जात होती. अजिंक्यच्या कुटुंबाने राजकीय तसेच पोलिसांसोबतच्या संबंधाचा वापर करून पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला", असेही भाग्यश्री यांनी म्हटले आहे.
डॉक्टर तरुणीची पोस्टमार्टम रिपोर्टवर सही
"मुलीचा मृत्यू होऊन पाच झाले तरी पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट दिला नाही. जवळपास एका महिन्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवण्यात आला. त्यात दीपालीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले गेले होते. हे खोटे होते. मुलीचा पती अजिंक्य निंबाळकर याने हा गुन्हा दाबण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचा वापर केला. पोस्टमार्टम रिपोर्टवर महिला डॉक्टरची सही होती. तिच्यावर सही करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता", असेही भाग्यश्री पांचगणे यांनी म्हटले आहे.