Satara Crime: काम बघायला जातो म्हणत नववी, दहावीतील मुलांनी सोडलं घर; पालक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:34 IST2025-07-07T13:33:51+5:302025-07-07T13:34:13+5:30
पोलिसांकडून तपास सुरू

Satara Crime: काम बघायला जातो म्हणत नववी, दहावीतील मुलांनी सोडलं घर; पालक चिंतेत
सातारा : नववी आणि दहावीतील दोन मुलांनी अचानक घर सोडल्याने पालक चिंतेत आहेत. काम बघायला जातो, असे सांगून दोन्ही मुले घरातून गायब झाली आहेत. सातारा तालुका पोलिसांनी संबंधित दोन्ही मुलांचा तातडीने शोध सुरू केला आहे.
सक्षम श्रीकांत घाडगे (वय १६), जीवन शिवाजी जाधव (१५, दोघेही रा. सैदापूर, ता. सातारा) अशी गायब झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीकांत दिलीप घाडगे (३७, रा. सैदापूर) हे ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजता कामावरून घरी जात होते. त्यावेळी त्यांचा मुलगा सक्षम आणि चुलत मेहुण्यांचा मुलगा जीवन हे दोघे रस्त्याने चालत जाताना दिसले.
यावेळी त्यांनी तुम्ही दोघे कुठे चालला आहात, असे विचारले. यावर त्यांनी आम्ही काम बघून परत येतो, असे सांगितले. मात्र, रात्री दोघेही घरी परत आले नाहीत. त्यामुळे श्रीकांत घाडगे चिंतेत पडले. सकाळी उठून त्यांनी मुलांचा शोध सुरू केला. सातारा शहरापासून अगदी पंढरपूरपर्यंत त्यांनी मुलांचा शोध घेतला. परंतु, दोघेही सापडले नाहीत.
अखेर त्यांनी ४ जुलै रोजी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही मुले गायब झाल्याची तक्रार नोंदवली. सक्षम हा दहावी, तर जीवन हा नववीत शिक्षण घेत आहे. पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.