कराडात अन्नविषबाधेतून मोकाट कुत्र्यांचा मृत्यू!, प्राणिमित्र संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:24 IST2026-03-27T12:23:51+5:302026-03-27T12:24:30+5:30
कराड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

कराडात अन्नविषबाधेतून मोकाट कुत्र्यांचा मृत्यू!, प्राणिमित्र संघटना आक्रमक
कराड : कराड शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असताना अन्नातील विषबाधा होऊन तब्बल वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे कराड शहरात खळबळ उडाली असून, प्राणिमित्र संघटना आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कराड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड शहरामध्ये सध्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्री आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील कासार गल्ली, चावडी चौक, विठ्ठल चौक, कन्याशाला मंगळवार पेठ, आदींसह परिसरात मोकाट कुत्री मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांना दिसून आले.
या घटनेनंतर प्राणिमित्र गणेश पवार यांच्यासह ‘बिइंग ह्युमन’ ग्रुपच्या सदस्यांनी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्याशी संपर्क साधून विषबाधेमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुत्र्यांच्या घटनेची चौकशी करून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. त्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्यात गणेश पवार यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास
शहरातील विविध ठिकाणी कुत्री विषबाधा होऊन मृत्युमुखी पडल्याचे प्राथमिक निदर्शनास आले असले तरी एकंदरीत कुत्र्यांची संख्या पाहता ती २० हून अधिक असल्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.
मृत कुत्र्यांची विल्हेवाट
करार शहरात गुरुवारी अन्नातून विषबाधा होऊन कुत्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याची माहिती कराड पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मृत कुत्र्यांची विल्हेवाट लावली.
पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन
मोकाट कुत्री गुरुवारी सकाळी मृत पावल्यानंतर संबंधित कुत्र्यांना कराडच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेण्यात आले. या ठिकाणी कुत्र्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर संबंधित कुत्र्यांचा मृत्यू हा अन्नातील विषबाधेतून झाला असल्याचे प्राथमिक माहिती देण्यात आली.
मेनका गांधींचा पोलिसांशी संवाद
शहरातील बेवारस श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामागे विषबाधेचा संशय असल्याने प्राणिमित्रांनी याबाबत नगरपालिका प्रशासनाने पोलिसांत तक्रार देण्याची मागणी केली. याबाबत पालिका प्रशासनाने हात वर केल्यानंतर प्राणिमित्रांनी पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी सुरुवातीला पोलिसांनी नगरपालिकेकडून तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे सांगितले.