सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये आढळली ऑर्किड वनस्पती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:22 IST2025-10-13T18:22:32+5:302025-10-13T18:22:46+5:30
फलटणसारख्या शुष्क पानझडी काटेरी वनांमध्ये याची प्रथमच नोंद

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये आढळली ऑर्किड वनस्पती
फलटण : पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या काही दुर्मीळ व औषधी वनस्पती आणि फलटणसारख्या गवताळ प्रदेशामध्ये येणारी प्रवासी पाहुणे पक्षी यांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी भटकंती करत असताना, ग्लोबल अर्थ फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सचिन जाधव आणि सदस्य गणेश कापडे यांना गौताळ प्रदेशांमध्ये बटरफ्लाय ऑर्किड वनस्पती आढळून आली.
ही वनस्पती प्रथमच फलटण परिसरात आढळून आल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. ऑर्किड वनस्पती शक्यतो सदाहरित वनांमध्ये किंवा अति पर्जन्यमान असणाऱ्या भागांमध्ये आढळतात. महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटातील खंडाळा या ठिकाणी आढळणारे ऑर्किड असल्याने याला क्वीन ऑफ खंडाळा या नावाने ओळखले जाते. याला मराठीमध्ये वाघचोरा असे नाव आहे. याचे शास्त्रीय नाव Pecteitis Gigantea असून, याला लेडी सुजांस किंवा बटरफ्लाय ऑर्किड या नावाने ओळखले जाते.
हे ऑर्किड सुगंधित ऑर्किड पैकी एक असल्याने याला जमिनीवर उगवणारे सुगंधीत ऑर्किड म्हटले जाते. एक ही एक सुगंधित ऑर्किडची प्रजाती असून, भारतामध्ये सदाहरित वनांमध्ये समुद्रसपाटीपासून साधारणपणे १८०० फूट उंचीच्या पुढील डोंगर रांगांमध्ये आढळते.
फलटणसारख्या शुष्क पानझडी काटेरी वनांमध्ये याची प्रथमच नोंद होत आहे. सदाहरित वनांमध्ये आढळणारे ऑर्किड फलटणसारख्या ठिकाणी आढळणे ही एक नाविन्यपूर्ण आणि आश्चर्यकारक बाब आहे. यामुळे येथे आढळणाऱ्या वाघचोरा ऑर्किड तसेच इतर दुर्मिळ व औषधी मुळे फलटणच्या जंगलांचे महत्त्व अधोरेखित होते.
फलटण वनपरिक्षेत्रामध्ये जैवविविधतेसाठी चांगले आणि पोषक वातावरण तयार झाले. येणाऱ्या काळामध्ये जल, जंगल आणि जमीन याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वन विभागामार्फत चांगले उपक्रम हाती घेतले जातील. वनस्पती पक्षी प्राणी यांच्या संवर्धनासाठी लोकसहभागातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. हे सर्व अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - निकिता बोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण