Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:56 IST2025-07-26T18:53:37+5:302025-07-26T18:56:58+5:30
शाळेतून मुलांना आणायला निघाली असता काळाचा घाला

Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी
शिरवळ : भरधाव कारने दुचाकीसह एका पादचारी महिलेला जोराची धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. गंगामा बसवराज कितनुर (वय ३२, मूळ रा.बंगळुरू रा.कर्नाटक स. रा. फुलोरा सोसायटी, शिरवळ) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कारचालकासह दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. लोणंद ते शिरवळ महामार्गावर शिरवळ गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
गणेश दिलीप भोईटे (३१) हे दुचाकी क्रमांक (एमएच-११-डीके-८३८३) ने पंढरपूर फाटा याठिकाणी निघाले होते. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पटांगणाजवळ आले असता लोणंदहून शिरवळकडे भरधाव वेगाने आलेल्या कार क्रमांक (एमएच -१२-टीएच-०३३७) ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दरम्यानच मुलांना शाळेतून आणण्यासाठी रस्त्यावर निघालेल्या पादचारी गंगामा कितनुर या महिलेलाही धडक दिली. यात महिला जागीच ठार झाली. अपघातात दुचाकीस्वार गणेश भोईटे, कारचालक प्रदिप ग्रामोपाध्याय (रा.कोथरूड,पुणे) हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जखमींना रुग्णालयात दाखल केले. कारचालक प्रदिप ग्रामोपाध्याय यांना अधिक उपचाराकरिता पुणे येथील हलविण्यात आले. मृत महिलेचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.