Satara News: महामार्गावरील गतिरोधकामुळे गेला एकाचा बळी, एसटीला दुचाकीची पाठीमागून धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 16:34 IST2023-03-28T16:31:14+5:302023-03-28T16:34:09+5:30
गतिरोधकामुळे अपघात होऊन एकाचा बळी गेल्यामुळे नागरिकांमधून संताप

Satara News: महामार्गावरील गतिरोधकामुळे गेला एकाचा बळी, एसटीला दुचाकीची पाठीमागून धडक
माणिक डोंगरे
मलकापूर : गतिरोधकामुळे एसटी चालकाने अचानक ब्रेक मारताच पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटून पाठीमागून एसटीला धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा आज, मंगळवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. वैभव विलास सोनके (वय ३२, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे मृत युवकाचे नाव आहे.
पुणे-बंगळूरू महामार्गावर एका हॉटेलसमोर काल, सोमवारी हा अपघात झाला. अपघाताची कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. महामार्गावरील गतिरोधकामुळे अपघात होऊन एकाचा बळी गेल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
अपघातस्थळी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सोनके हे दुचाकी (एमएच ५० ई २६१४) वरून कामानिमित्त पाचवड फाट्याकडे गेले होते. काम आटोपून घरी मलकापूरला परतत असताना शिवार हॉटेलसमोर आले असता वेंगूर्ला-स्वारगेट बस (एमएच २० बीएल ४०८०) च्या चालकाने महामार्गावर गतिरोधक दिसताच ब्रेक मारला. यावेळी वैभव सोनके यांची दुचाकी बसला पाठीमागून जोरात धडकली. यात सोनके यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले.
यावेळी नागरिकांनी सोनके यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा करून दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला. वैभव सोनके हे आई-वडिलांना एकुलते एक होते. त्यांना पत्नी व दोन लहान मुले आहेत.