पालकमंत्री कुणीही असो, भाजपचे काम थांबणार नाही : जयकुमार गोरे; शंभूराज देसाई म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:11 IST2026-01-19T20:11:00+5:302026-01-19T20:11:25+5:30

'सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे'

No matter who the Guardian Minister is BJP's work will not stop says Jayakumar Gore; Shambhuraj Desai said | पालकमंत्री कुणीही असो, भाजपचे काम थांबणार नाही : जयकुमार गोरे; शंभूराज देसाई म्हणाले...

पालकमंत्री कुणीही असो, भाजपचे काम थांबणार नाही : जयकुमार गोरे; शंभूराज देसाई म्हणाले...

सातारा : ‘पाटणमध्ये पालकमंत्री कोणीही असो किंवा मंत्री कोणीही असो; भाजपच्या कार्यकर्त्यांचे कोणतेही काम अडणार नाही. सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,’ अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांना इशारा देतानाच निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.

भाजपकडून रविवारी सातारा येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या पाटण तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘गटातटाचा विचार न करता आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समितीची लढाई लढायची आहे. राज्यात युती असली तरी पाटणमधील ही लढत मैत्रीपूर्ण असेल. या लढाईत भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला काहीही कमी पडू दिले जाणार नाही. इथे कोण मंत्री आहे याने फरक पडत नाही. तालुक्यात भाजपचे काम थांबणार नाही,’ असे सांगत त्यांनी शंभूराज देसाई यांना आव्हान दिले.

मंत्री गोरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता पाटणचे राजकारण कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या बैठकीला भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

जयकुमार गोरे यांच्या डोक्यात सत्ता गेली : शंभूराज देसाई

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघाबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, हे स्पष्ट करते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाटणकर गटाचे १०२ गावांमधील १९६६ प्रमुख कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केलेला आहे. हे लक्षात घ्यावे. पाटणची जनता याला भुलणार नाही, असा पलटवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्षांची युती करण्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीदेखील पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मी दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार, खासदार आणि दोन्ही मंत्र्यांना निमंत्रण पाठवले होते. मात्र, या बैठकीला भाजपचे दोन्ही मंत्री आले नाहीत.

भाजपने केवळ माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना चर्चेसाठी पाठवले होते. त्यांच्याशी चर्चा झाली मात्र निवडणुकीतील युतीचा निर्णय भाजपचे मंत्री आणि खासदार आमदार यांना विचारून घेऊ, असे त्यांनी सांगितले. दोन वेळचा अनुभव पाहता भाजपकडून युतीसंदर्भात कोणताही प्रतिसाद मिळत नाही. आता शिंदेसेना म्हणून आमचे पदाधिकारी एकत्र बसून पुढील रणनीतीसंदर्भात निर्णय घेतील, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करू

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पालकमंत्री या नात्याने मी महायुतीतील घटक पक्षांची युती घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र, नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्येदेखील भाजपकडून बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शिंदेसेना आपली भूमिका स्पष्ट करेन, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

Web Title: No matter who the Guardian Minister is BJP's work will not stop says Jayakumar Gore; Shambhuraj Desai said