नवे बसस्थानक राजकीय वादाच्या ‘कचऱ्या’त!

By Admin | Updated: January 13, 2015 00:17 IST2015-01-12T21:32:26+5:302015-01-13T00:17:49+5:30

प्रवासी जुन्याच स्थानकात : वाठार स्टेशनमध्ये केवळ उद््घाटनाचा दोन वेळा देखावा; वापरापूर्वीच सुरू झाली मोडतोड

New bus station's 'waste' in political debate! | नवे बसस्थानक राजकीय वादाच्या ‘कचऱ्या’त!

नवे बसस्थानक राजकीय वादाच्या ‘कचऱ्या’त!

संजय कदम - वाठार स्टेशन : राज्य परिवहन महामंडळाने वाठार स्टेशन येथे सर्व सुविधानियुक्त असे ३३ लाखांचे नवीन बसस्थानक बांधले. बसस्थानकाचे उद्घाटन दोनदा झाले. मात्र, राजकीय वादाचा याला फटका बसला आणि पाच वर्षांपासून या बसस्थानकात घाणीचं साम्राज्य पसरले आहे.
वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील नवीन बसस्थानकाच्या उद्घाटनाला सरपंच अमोल आवळे यांना बोलविण्यात आले नाही. त्यामुळे उद्घाटनाच्या दिवशीच त्यांनी विभाग नियंत्रकांच्या गाडीच्या काचा फोडून निषेध केला. आवळे यांच्या या आक्रमकतेनंतर पुन्हा एकदा या बसस्थानकाचे उद्घाटन आवळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. त्यावेळी या नवीन बसस्थानकाला हिरवा कंदील दाखवितानाच रेल्वे हद्दीतील बसस्थानकही सुरू ठेवावे, अशा सूचना विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या. त्यानंतर काही दिवस नव्या बसस्थानकात एखादी दुसरी बस ये-जा करीत होती. परंतु, त्यानंतर बस येणे व जाणेच बंद झाले. बस येत नाहीत, त्यामुळे प्रवाशांनाही नव्या बसस्थानकाकडे पाठ फिरवित जुन्याच बसस्थानकाचा मार्ग निवडला.
बसस्थानकातील शौचालय, प्लॅटफॉर्मची मोडतोड करण्यात आली आहे. घाणीचे साम्राज्य पसरले असून, झाडेझुडपे वाढली आहेत. नवीन बसस्थानकाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न परिसरातील जनतेला पडला आहे. वाठार स्टेशनचे नवीन बसस्थानक आज पाच वर्षांपासून धूळखात पडले आहे. दोनवेळच्या उद्घाटनानंतरही परिवहन महामंडळाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. दोन राजकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बसस्थानक बंद आहे, अशी चर्चा होत आहे.

वाठार स्टेशन व वाठार गाव असा भेदभाव कधीही केला नाही. जुने व नवीन बसस्थानक ही दोन्हीही सुरू राहावीत ही माझी भूमिका आहे. नवीन बसस्थानक सुरू करून जुने बंद केल्यास त्याला माझा विरोध काय राहील.
-अमोल आवळे, सरंपच वाठार स्टेशन
या बसस्थानकाचे आम्ही कधीही राजकीय भांडवल केलेले नाही. जुने बसस्थानक बंद करावे व नवीन सुरू ठेवा, ही माझी भूमिका नाही तर नव्यासाठी नवीन यंत्रणा महामंडळाने द्यावी. दोन्हीही बसस्थानके सुरू राहावीत, अशी मागणी आहे.
-नागेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस
जुने बसस्थानक रेल्वेच्या जागेत आहे. या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाला सेवा-सुविधा निर्माण करता येणार नाहीत. त्यामुळे नवीन बसस्थानकासाठी आता पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून मार्ग काढणार आहे.
-महेंद्र जगताप, शिवसेना


३३ लाखांचे बसस्थानक
वाठार स्टेशन व वाठार गाव यामधून सातारा-लोणंद हा राज्यमार्ग गेला आहे. वाठार रेल्वे स्थानकात सध्या बसस्थानक एका खोलीत भाडे तत्त्वावर आहे. या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. याशिवाय बसेसना वडाप वाहतुकीचा मोठा अडथळा होत आहे.
२४ तासांतील किमान सहा तास रेल्वे गेट बंद असल्यामुळे हा रस्ताही बंद असतो. यासाठी परिसरातील काही गावांनी काही वर्षांपूर्वी नवीन बसस्थानक बांधावे, यासाठी संबंधितांना ठराव दिला होता. यावर स्थानिक व व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शविला होता.
बसस्थानक आहे त्याच ठिकाणी ठेवण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे हा वाद अखेर न्यायालयात गेला होता. त्यानंतर प्रवाशांच्या हितार्थ नवीन बसस्थानकाचा मार्ग मोकळा झाला. एक वर्षात नवीन बसस्थानक बांधण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यामुळे सुमारे ३३ लाखांचे बसस्थानक सातारा-लोणंद राज्यमार्गावर बांधण्यात आले.

Web Title: New bus station's 'waste' in political debate!