पर्यटनाच्या नावावर गंडा घालणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 23, 2015 00:31 IST2015-11-22T22:47:16+5:302015-11-23T00:31:45+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : बाराजणांनी दिली तक्रार

In the name of tourism, the accused are finally lodged | पर्यटनाच्या नावावर गंडा घालणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

पर्यटनाच्या नावावर गंडा घालणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

सातारा : पर्यटनाच्या नावावर अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘हॅप्पी एक्सफ्लोझर टूर’ या कंपनीचा जयदीप श्रीरंग काशीकर (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाला वाचा फोडल्याने अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
‘पर्यटनाच्या नावावर लाखोंचा गंडा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. १८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या कंपनीने साताऱ्यातील पर्यटकांशी कशा पद्धतीने फसवूणक केली आहे. याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला होता. कंपनीने खास दिवाळीसाठी विविध आॅफर देऊन पर्यटकांना आकर्षिक करून घेतले होते. त्यामुळे अनेकांनी या कंपनीमध्ये फिरण्यास जाण्यासाठी बुकिंगही करून ठेवले होते. कंपनीचे कार्यालयात येथील मंगळवार पेठेत आहे. काशीकरने दिवाळी पाडव्यादिवशी काही लोकांना बोलावून त्यांच्या ताब्यात त्यांची कागदपत्रे, विमानाची तिकिटे, सहलीविषयीची पूर्ण माहिती, टूर मॅनेजरचा मोबाईल क्रमांक आदी सर्व गोष्टी ताब्यात दिल्या होत्या. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याच रात्री ‘उद्या किती वाजता निघायचे,’ याच्या चौकशीसाठी काहीजण काशीकरला फोन करू लागले; मात्र काशीकरचा फोन बंद झाला. भाऊबीजेदिवशी काहींनी पहाटेच्या सुमारास काशीकरचे आॅफिस गाठले तर त्याला टाळा होता. काहींनी चौकशी करून घर शोधले तर ज्या फ्लॅटमध्ये तो राहत होता. त्या फ्लॅटलाही कुलूप होते. ट्रिपच्या आदल्या दिवशीच काशीकर गाशा गुंडाळून गायब झाल्याचे नागरिकांना समजले. त्याने दिलेली तिकिटे आणि कागदपत्रे सर्व बोगस असल्याचे पुढे आले. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारांकडे असलेली कागदपत्रांची शहानिशा केली. त्यानंतर काशीकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. लक्ष्मण सदाशिव पवार (रा. शाहूपुरी) यांच्यासह बाराजणांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक झालेले आणखी काही तक्रारदार पोलिसांकडे आले असून, तक्रारदारांकडे असलेली कागदपत्रे पोलीस तपासत आहेत. त्यामुळे तक्रारदारांची संख्या आणखी वाढणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the name of tourism, the accused are finally lodged