Satara Crime: डोंबाळवाडी येथे तरुणाचा गळा आवळून खून, चुलत भावासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 18:32 IST2023-05-31T18:32:09+5:302023-05-31T18:32:42+5:30
किरकोळ वादाच्या रागातून गळा दाबून केला खून

Satara Crime: डोंबाळवाडी येथे तरुणाचा गळा आवळून खून, चुलत भावासह दोघांना अटक
लोणंद : शेतामधील पाइप वापरण्याच्या कारणावरून सचिन नागनाथ धायगुडे (वय ३५, रा. डोंबाळवाडी, ता. फलटण) या तरुणाचा चुलत भावासह दोघांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक करून खुनाचा उलगडा केला.
प्रदीप दत्तात्रय टेंगले उर्फ चिक्या (वय २५), राहुल नामदेव धायगुडे (वय ३०, दोघेही रा. डोंबाळवाडी, ता. फलटण) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन धायगुडे हा मंगळवार (दि. २३) रोजी सायंकाळच्या सुमारास त्याच्या बोरी नावाच्या शिवारात गुरांच्या धारा काढण्यासाठी जातो, असे सांगून गेला होता. मात्र, रात्री आठ वाजले तरी तो घरी आला नाही. शोध घेवूनही तो सापडला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयांनी लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
दरम्यान, बुधवारी सकाळी सचिन याचा मृतदेह कॅनाॅल शेजारी असणाऱ्या एका विहिरीत आढळून आला. विहिरीतून मृतदेह वर काढल्यानंतर त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लोणंद पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या दोन तासांत या खुनाचा छडा लावून प्रदीप टेंगले आणि चुलत भाऊ राहुल धायगुडे यांना अटक केली. साइपनच्या पाइप वापरण्याच्या कारणावरून या दोघांनी सचिन धायगुडेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बंद असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकल्याची दोघांनी कबुली दिली. पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करीत आहेत.
घटनेपूर्वी दुपारी वाद
सचिन धायगुडे याच्या साइपन पाइपची दोघा संशयित आरोपींनी तोडफोड केली होती. यावरून त्यांच्यामध्ये घटनेदिवशी दुपारी वादावादी झाली होती. याचा राग मनात धरून चिक्या आणि राहुलने सचिनचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.