Satara Politics: पक्ष दुभंगले तरी मने नाही दुभंगली; शशिकांत शिंदे, रामराजेंची विधान परिषदेत एकत्र एन्ट्री
By दीपक देशमुख | Updated: March 5, 2025 16:15 IST2025-03-05T15:26:44+5:302025-03-05T16:15:27+5:30
सातारा : पक्ष दुभंगले तरी सातारा जिल्ह्यातील नेत्यांची मने दुभंगलेली नसल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनाला दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ...

Satara Politics: पक्ष दुभंगले तरी मने नाही दुभंगली; शशिकांत शिंदे, रामराजेंची विधान परिषदेत एकत्र एन्ट्री
सातारा : पक्ष दुभंगले तरी सातारा जिल्ह्यातील नेत्यांची मने दुभंगलेली नसल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनाला दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे आणि अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर या दोघांचीही विधान परिषदेत एकत्रच एन्ट्री झाली. दोघांचेही एकत्रित फोटो व्हायरल झाल्यामुळे आता खुमासदार चर्चा साताऱ्यात रंगली आहे.
विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सर्वच पक्षांचे मंत्रीमहोदय आणि आमदार येथे येत आहेत. तथापि, मंगळवारी रामराजे आणि शशिकांत शिंदे हे विधान परिषदेत एकाच कारमधून विधान परिषदेच्या आवारात आले. गाडीतून उतरून दोघेही विधान परिषदेत एकत्रच चालत गेले. यामुळे सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेस २०२३ पर्यंत एकसंध आणि बळकट होती आणि पक्षात रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे खंदे शिलेदार होते. परंतु, पक्षात फूट पडल्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर अजित पवार यांच्यासोबत गेले. शशिकांत शिंदे यांनी मात्र खा. शरद पवार यांची साथ सोडली नाही. पक्ष दुभंगल्याने हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात गेले तरी मनाने मात्र या दोन्ही नेत्यांची दोस्ती कायम असल्याचे पुन:पुन्हा अधोरेखित होत आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटणचा पाणीप्रश्न सध्या पेटला आहे. जिहे-कठापूरचे पाणी माण-खटावला जात असल्यामुळे कोरेगावकरांतूनही विरोध होत आहे. जिल्ह्यातील या पाणीप्रश्नावर हे दोन्ही विधान परिषदेत आवाज उठवतील, अशी अपेक्षा व्यक्त आहे.
अधिवेशनादरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी करत घोषणा दिल्या. अबू आझमी, कोरटकर, सोलापूरकर आदी लोकं चुकीची वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष तसेच मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? याप्रकरणी कारवाई केली नाही तर महाविकास आघाडीचे सदस्य सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला.
रामराजे यांची अदृश्य शक्ती
राजकारणातील चाणक्य रामराजे नाईक-निंबाळकर कोणत्याही पक्षात असले तरी त्यांची अदृश्य शक्ती नेमकी कोठे असते, याचा कोणाला मागमूस लागत नाही. रामराजे यांनी अजित पवार यांच्या पक्षात असले तरी जो आपले काम करणार तो आपला पक्ष, अशीही भूमिका ते कधी जाहीर करतात. त्यामुळे ते शिंदे यांच्यासोबत सहजच गेले तरी चर्चा तरी होणारच.