सातारा - ‘पोरं मला व तुम्हालाही मारायला येतील, चला घराबाहेर,’ असं अचानक तरूण बडबडू लागला. दोन दिवसांतच त्याचे मानसिक संतुलन बिघडले. इतके बिघडले की, त्याने घराच्या पाठीमागे कंबरेच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला. ही घटना फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे घडली. शिक्षण घेत काम करणारा पंकज सोनवलकर हा २८ वर्षीय तरूण फलटणमधील एका ठिकाणी काम करत होता. सगळ सुरळीत असताना शनिवारी तो कामावरून घरी आला. रविवारी मी कामावर जाणार नाही, असं तो घरातल्यांना सांगू लागला.
घरातलेही त्याला नको कामावर जाऊ, असं म्हणू लागले. पण अचानक त्याचं बोलणं बदलंल. मला व तुम्हालाही पोर मारतील, चला बाहेर, असं तो बोलू लागला. घरातले त्याला समजावून सांगत होते. पण तो हेच शब्द सतत बोलत होता. काळजीपोटी घरातल्यांनी त्याला एका डॉक्टरांकडे नेले. औषधोउपचार झाल्यानंतर त्याला घरी आणले. काहीवेळ तो शांत झाला. पण नंतर त्याचे पुन्हा बोलणे सुरू झाले. काही दिवस त्याचे वागणे असेच सुरू होते.
गुरुवारी रात्री तो झोपेतून अचानक उठला. घरापासून जवळच असलेल्या डिपीजवळ जाऊन त्याने वायर काढली. त्यामुळे मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक धावून आले. त्यानंतर त्याला घरात आणण्यात आले. रात्री दोनपर्यंत घरातील सर्वजण त्याच्या काळजीने जागे होते. पण काही वेळानंतर घरातल्यांची झोप लागल्यानंतर तो घराबाहेर गेला. त्याच्या घराच्या पाठीमागील कंपाऊंडच्या जाळीस कंबरेच्या पट्टयाने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घरातल्यांना मोठा मानसिक धक्का बसला.
पंकजचा कोणासोबतही वाद झाला नसताना तो पोरं मारतील, असं का म्हणत होता. अचानक मानसिक संतूलन त्याचे कसे बिघडले, हे समोर येणे गरजेचे आहे. या घटनेची फलटण ग्रामीण फलटण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार आर. बी. लिमन हे अधिक तपास करत आहेत.