देशातील ४३०० आमदारांचे मुंबईत संमेलन, रामराजे नाईक-निंबाळकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 09:14 PM2023-05-20T21:14:31+5:302023-05-20T21:14:56+5:30

MIT तर्फे १५ जूनपासून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे आयोजन

Meeting of 4300 MLAs of the country in Mumbai says MLA Ramraje Naik-Nimbalkar | देशातील ४३०० आमदारांचे मुंबईत संमेलन, रामराजे नाईक-निंबाळकर यांची माहिती

देशातील ४३०० आमदारांचे मुंबईत संमेलन, रामराजे नाईक-निंबाळकर यांची माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: इतिहासामध्ये प्रथमच देशातील ४३०० आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर चर्चा करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ मुंबई येथील बीकेसी जिओ सेंटरमध्ये १५ ते १७ जून या काळात होत आहे, अशी माहिती विधान परिषद माजी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, एमआयटी माध्यम समन्वयक योगेश पाटील यांनी दिली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर समन्वयक रवी पाटील, माई साळुंखे, आरती जाधव यावेळी उपस्थित होते.

रामराजे पुढे म्हणाले, राज्यातील सर्व पक्षांतील आमदारांनी संमेलनात सहभागी होऊन लोकशाहीला अधिक सशक्त करण्यासाठी योगदान द्यावे. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व सर्वांगीण शाश्वत विकास या त्रिसूत्रीचा उद्देश ठेवून आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन १५ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. याव्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील-चाकुरकर, मनोहर जोशी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.
संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना : शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती या विषयांवर चर्चा होणार असल्याचे रामराजे यांनी सांगितले.

याशिवाय जीवन संतुलन, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला, विधिमंडळ कार्यप्रदर्शन, नोकरशहा आणि आमदार या विषयांवर चर्चा होणार आहे. गोलमेज परिषदेत ‘भारत २०४७ आमचे लक्ष्य’ या विषयावर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा होणार आहे. राजकारणाचे आध्यात्मिकीकरण, व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा, विधिमंडळाचे कामकाज : आव्हाने आणि पुढील मार्ग यावर सर्व राज्य विधानमंडळांच्या सचिवांची चर्चा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, कायदेशीर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे. या विषयांवरील प्रत्येक सत्रामध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि पक्षनेता भूषविणार आहेत. या राष्ट्रीय विधायक संमेलनात आतापर्यंत भारतातील सर्व राज्यांतील एकूण १८०० आमदारांनी उपस्थिती दर्शविली आहे. तसेच २५०० आमदार येण्याची अपेक्षा असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Meeting of 4300 MLAs of the country in Mumbai says MLA Ramraje Naik-Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.