Satara: मल्याळम दरोडेखोरांचा शोध, दुभाषक बनला पोलिस!, कार चालकाला अडवून लांबविली होती २० लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:23 IST2025-07-21T15:23:26+5:302025-07-21T15:23:52+5:30
टीप देणाऱ्याचा शोध सुरु

Satara: मल्याळम दरोडेखोरांचा शोध, दुभाषक बनला पोलिस!, कार चालकाला अडवून लांबविली होती २० लाखांची रोकड
सातारा: भुईंज येथील दरोड्यातील एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला. परंतु तो कन्नड अन् मल्याळम बोलू लागला. तो काय म्हणतोय हे पोलिसांना समजेना. अखेर या दोन्ही भाषा येणारा दुभाषक पोलिसांनी शोधला. त्याला सोबत घेऊन दरोडेखोरांचा शोध सुरू झाला. काही तासांसाठी दुभाषक ऑनरेकाॅर्ड पोलिसच बनला. त्याच्या मदतीने केरळमध्ये जाऊन सातारा पोलिसांनी एक-दोन नव्हे तर सहा दरोडेखोरांना अटक केली. या दुभाषकाशी पोलिसांची चांगलीच गट्टी जमली.
भुईंज येथील महामार्गावर १२ जुलैच्या रात्री सात-आठ दरोडेखोरांनी कार चालकाला अडवून २० लाखांची रोकड लांबविली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. एका आरोपीला सांगली पोलिसांनी पकडल्यानंतर सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची भाषा पोलिसांसाठी अडसर ठरू लागली. काही तास दुभाषक शोधण्यात गेले. पण जो दुभाषक पोलिसांच्या साथीला मिळाला. तो कन्नड अन् मल्याळम बोलण्यात एक्सपर्ट होता.
मुख्य दरोडेखोर विनीथ याला घेऊन सातारा पोलिसांची टीम केरळमध्ये गेली. दुभाषक जे सांगणार होता. त्यावरच पोलिसांचा तपास अवलंबून होता. त्यामुळे त्या दुभाषकाची रितसर नोंद करून वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली. केरळ पोलिसांना सोबत घेण्यात आले. परंतु तेथील पोलिसांवर फारसा भरवसा न ठेवता सोबत असलेल्या दुभाषकावरच आपल्या सातारा पोलिसांचा भरवसा अधिक होता.
मुख्य दरोडेखोराने सांगितलेल्या माहितीच्या आधारे केरळमधील वायनाड येथून एक-एक करत तब्बल सहा दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. एकेका दरोडेखोराची चाैकशी झाली. या चाैकशीत ही टोळी आंतरराज्य टोळी असल्याचं स्पष्ट झालं. अत्यंत खतरनाक अशी ही मल्याळम अन् कन्नड दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात साताऱ्यात आणली.
मल्याळम दरोडेखोरांना टीप देणारा महाराष्ट्रीयनच
सांगलीतील एका व्यावसायिकाची मुंबई आणि विटा येथे ज्वेलर्सची दुकाने आहेत. या दुकानाची २० लाखांची रोकड मुंबईला नेली जात होती. याची टीप या मल्याळम दरोडेखोरांना महाराष्ट्रीयन व्यक्तीनेच दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. हा टीप देणारा कोण, हे आता पोलिस शोधत आहेत.
‘त्यांनी’ पेट्रोलसाठी २४ हजार वापरले!
तब्बल २० लाखांची रोकड चोरून नेल्यानंतर दरोडेखोरांनी त्यातील २४ हजार रुपये पेट्रोलसाठी खर्च केले. उर्वरित रक्कम त्यांनी सुरक्षित ठेवली होती. त्यामुळे एवढी मोठी रक्कम सुरक्षितपणे पोलिसांना हस्तगत करता आली.
यामुळे पोलिसांचा ताणही हलका
या दुभाषकाशी पोलिसांची चांगलीच गट्टी जमली होती. तो दोन्ही भाषा समजावून सांगताना काही अवघड शब्द ऐकून पोलिसांना हसू आवरता यायचे नाही. यामुळे पोलिसांचा ताणही हलका होत होता. केवळ शब्दातूनच नव्हे तर हावभावातूनही ही भाषा वेगळी असल्याचे पोलिस सांगताहेत.