Satara: महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, वेण्णा तलाव ओव्हर फ्लो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:36 IST2025-06-21T18:35:44+5:302025-06-21T18:36:09+5:30
महाबळेश्वर, पाचगणीचा पाण्याचा प्रश्न मिटला

Satara: महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, वेण्णा तलाव ओव्हर फ्लो
महाबळेश्वर : मुसळधार पावसाने गेली तीन दिवस महाबळेश्वरला अक्षरशा झोडपून काढल्याने ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शहराची जीवनदायिनी असणारा वेण्णा लेक आज, शनिवारी पहाटे ओव्हर फ्लो झाल्याने महाबळेश्वर व पाचगणी वासियाचा पाणी प्रश्न मिटला आहे. गेल्या २४ तासात ७३ मिमी २ इंच पावसाची नोंद झाली आली.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवस उसंत घेतली होती. ग्रामीण भागात मात्र पावसाची संततधार सुरूच होती. डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे ग्रामीण भागातील रस्ते काही ठिकाणी खचले, वाहून गेल्याच्या घटना घडल्या. शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाले व ओढ्यांची पाणीपातळी वाढली आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असणारा वेण्णा लेकही ओव्हर फ्लो झाला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
वेण्णा तलावामधून महाबळेश्वर व पाचगणीला पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वेण्णा लेक ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांनी याठिकाणी गर्दी केली होती.