कोयना धरण ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर! ५६ टक्के भरले; कण्हेरमधून विसर्गात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 01:12 IST2025-07-04T01:10:43+5:302025-07-04T01:12:06+5:30
तर कण्हेर धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे...

कोयना धरण ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर! ५६ टक्के भरले; कण्हेरमधून विसर्गात वाढ
नितीन काळेल -
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासांत महाबळेश्वरला १२४, तर कोयनानगरला ९० मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ५८.८१ टीएमसी झाला आहे. सुमारे ५६ टक्के धरण भरले. तर कण्हेर धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. जून महिन्यात दमदार पाऊस झाला, तर जुलै महिना सुरू झाल्यापासूनही पाऊस पडतच आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप असलीतरी पश्चिमेकडे दमदार हजेरी आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात ओढे, नाले भरभरून वाहू लागलेत. प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वेगाने वाढू लागला आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येऊ लागला आहे. त्यातच बहुतांशी मोठी धरणे ही ७० टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत.
गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९०, नवजाला ७३ आणि महाबळेश्वरला १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धरणात ३३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणात ५८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यातूनच १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १ हजार ६९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर नवजाला १ हजार ४६७ आणि महाबळेश्वर येथे १ हजार ६३६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
साताऱ्यात ढगाळ वातावरण...
सातारा शहरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गुरुवारी सकाळी काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. पण, बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण तयार झालेले होते, तर सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र, पाऊस होत आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप आहे.
कण्हेरमधून विसर्ग वाढला... -
कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत चाललाय. सध्या धरणात ७.१९ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ७१ टक्के भरले आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी दुपारपासून सांडव्यातून एक हजार क्यूसेक विसर्ग वाढविण्यात येणार होता. त्यामुळे वेण्णा नदीत सांडव्यावरून दोन हजार तसेच विद्युतगृहातून ७०० क्यूसेक पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कण्हेरमधून एकूण २ हजार ७०० क्यूसेक विसर्ग होणार होता.