Satara: कोयनेचे दरवाजे चौथ्यांदा उघडले; १५ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:12 IST2025-09-04T15:12:34+5:302025-09-04T15:12:54+5:30
सततच्या पावसामुळे शेतीची कामेही खोळंबली

Satara: कोयनेचे दरवाजे चौथ्यांदा उघडले; १५ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु
सातारा : जिल्ह्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून, २४ तासात महाबळेश्वर येथे ४७, तर नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात १०३.६४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तसेच धरण भरण्यासाठी दीड टीएमसी पाण्याची गरज असली तरी आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे चौथ्यांदा उघडून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे धरणातून एकूण १५ हजार ७०० क्यूसेक विसर्ग होत आहे.
जिल्ह्यातील पावसाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत तीन महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाले आहे. तरीही प्रमुख पाणी प्रकल्प भरत आले आहेत, ही समाधानाची बाब आहे. त्यातच सध्याही पाऊस पडत आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे चांगलीच हजेरी लागत आहे. कास, तापोळा, बामणोली, काेयनानगर, महाबळेश्वर भागात सततच्या पावसामुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ५४ मिलिमीटर झाले आहे, तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात १५ हजार २१९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून १०३.६२ टीएमसी झाला होता. २४ तासात धरणात सवा टीएमसीहून अधिक पाणी आवक झाली.
धरण भरू लागल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोयनेचे दरवाजे चाैथ्यांदा उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पायथा वीजगृह २ हजार १०० आणि दीड फूट दरवाजे उचलून १३ हजार ६०० असा एकूण १५ हजार ७०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
दरम्यान, एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे ४ हजार ३३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला ५ हजार ३७० आणि महाबळेश्वरमध्ये ५ हजार १५३ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. सातारा शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास पावसाची उघडीप होती. त्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शन झाले.