कोल्हापूर सर्किट बेंच आयुष्यातील सर्वोच्च बिंदू - भूषण गवई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:53 IST2026-02-20T13:53:04+5:302026-02-20T13:53:45+5:30
‘बुलडोझर जस्टिस’ विरोधात दिलेला निवाडा माझ्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा आणि समाधानकारक

कोल्हापूर सर्किट बेंच आयुष्यातील सर्वोच्च बिंदू - भूषण गवई
उंडाळे : ‘संविधानानुसार काम करताना कोणाचेही घर पाडणे ही न्यायाची पद्धत असू शकत नाही. ‘बुलडोझर जस्टिस’ विरोधात दिलेला निवाडा माझ्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा आणि समाधानकारक ठरला, तर कोल्हापूर सर्किट बेंच हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बिंदू होता,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
उंडाळे स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षपदी साहित्यिक विश्वास पाटील होते. यावेळी मेघालय उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रदीप देशमुख उपस्थित होते.
भूषण गवई म्हणाले, ‘२४ ऑगस्ट रोजी दादांच्या नेतृत्वाखाली निघालेला सत्याग्रहाचा मोर्चा आणि त्यांनी भोगलेला तुरुंगवास आजही प्रेरणादायी आहे. उंडाळकर कुटुंबीयांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत, माझ्या जडणघडणीत विलास पाटील यांचा मोठा वाटा आहे. बुलडोझर जस्टिसचा संविधानाचे रक्षण करत असताना अन्यायकारकरीत्या घर पाडण्याविरोधात दिलेला निकाल ऐतिहासिक ठरला.
पुण्यातील बिल्डरांच्या घशात गेलेली वनविभागाची कोट्यवधी रुपयांची जमीन पुन्हा शासनाला मिळवून दिली. जिथे आज वृक्षलागवड झाली आहे. पर्यावरण रक्षणाला हातभार लागला याचा सार्थ अभिमान वाटतो.’
विदर्भातील वनजमीन प्रश्नाच्या बाबतीत ५० वर्षे प्रलंबित असलेला विदर्भातील जंगलाचा प्रश्न सोडवल्याने हजारो गरिबांच्या घरांवरील आणि शाळांवरील टांगती तलवार दूर झाली. ५१ हजार रुपयांच्या पुरस्काराच्या रकमेत स्वतःचे ५१ हजार रुपये मिळवून एक लाख दोन हजार रुपयांचा निधी त्यांनी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती म्हणून जाहीर केला.
उदयसिंह पाटील म्हणाले, ‘हा उपक्रम ४२ वर्षांपासून सुरू असून, नवीन पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास कळावा आणि लोकशाही बळकट व्हावी, हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
विश्वस्त गणपतराव कणसे यांनी मानपत्राचे वाचन केले. ॲड. विजय पाटील यांनी परिचय करून दिला. या सोहळ्याला रयत संघटनेचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.