पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर

By सचिन काकडे | Updated: January 25, 2025 13:44 IST2025-01-25T13:43:41+5:302025-01-25T13:44:02+5:30

पाण्यासाठी मोजावा लागत होता अवघा १ रुपया

Kas is the oldest water scheme of the city which supplies water to the city of Satara | पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर

पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर

सचिन काकडे

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी कास ही शहराची सर्वांत जुनी पाणीयोजना आहे. १८८६ सालापासून ही योजना सातारावासीयांची तहान भागवत आहे. आज जरी या तलावाचे धरणात रूपांतर झाले असले तरी या धरणाचा आजवरचा प्रवास रंजक आहे.

सातारा शहर वसविणाऱ्या शाहू महाराज थोरले यांनी शहरात तलाव, हौदांची निर्मिती केली. पुढे प्रतापसिंह महाराज यांनी जलवितरण व्यवस्था सक्षम करून शहरात पाणी खेळवले. सातारा शहराला प्रथम पाणीपुरवठा झाला तो यवतेश्वर मंदिरालगत असलेल्या तलावातून. खापरी नळाच्या माध्यमातून हे पाणी साताऱ्यात आले. मात्र, शहराचा विस्तार वाढू लागल्याने हे पाणी अपुरे पडू लागले अन् कास पाणी योजनेचा जन्म झाला.

१८७७ साली पूर्ण मातीकाम असलेल्या कास योजनेच्या कामास प्रारंभ झाला. तलाव बांधून हे पाणी पाटाने शहरापर्यंत आणण्याची ही योजना होती. १८८५ साली या योजनेसह २७ किलोमीटर पाटाचे काम पूर्णत्वास आले. कास तलाव समुद्र सपाटीपासून ११२० मीटर उंचीवर असल्याने या तलावाचे पाणी ‘सायफन’ पद्धतीने म्हणजेच नैसर्गिक उतराने शहरापर्यंत आणण्यात आले. १५ मार्च १८८६ साली पाणी पाटात सोडण्यात आले. ते एक-दोन नव्हे तर १५ दिवसांनी शहरापर्यंत पोहोचले. कास तलावापासून यवतेश्वर मंदिरापर्यंत पाट तयार करण्यात आला होता. ३ फूट रुंद व २.५ फूट खोली असणारा हा उघडा पाट आज इतिहासजमा झाला असला तरी आपले अस्तित्व टिकवून आहे.

असा आला होता खर्च..

कास पाणी योजना पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात आली असली तरी योजनेचा संपूर्ण खर्च पालिकेकडून करण्यात आला. सरकारकडून या योजनेस कोणतीही आर्थिक मदत मिळाली नव्हती. पालिकेने ३ लाख रुपये कर्ज ७ टक्के व्याजदराने घेऊन ही योजना पूर्ण केली. या योजनेला एकूण ३ लाख ६९ हजार १६४ रुपये खर्च आला. पाॅवर हाऊस व सांबरवाडी येथील दगडी टाक्यांमध्ये पाणी साठवून त्याचे वितरण केले जात होते.

अवघा १ रुपया कर

कासमधून प्रति माणशी ३० गॅलन (९० लिटर) पाणी पुरवले जाईल, असे नियोजन होते. या पाण्याचा कर १ हजार गॅलनला १ रुपया, असा निश्चित करण्यात आला होता.

असा होता जुना तलाव
लांबी : २१० मीटर
उंची : १५ मीटर
रुंदी : ९०- मीटर

Web Title: Kas is the oldest water scheme of the city which supplies water to the city of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.