Satara Politics: ..आता कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्षही ‘भाजप’च्या वाटेवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:40 IST2026-01-30T17:39:18+5:302026-01-30T17:40:40+5:30

फ्लेक्सवरील छबी बरंच काही सांगून जाते..

Karad North Congress President is also on the path of BJP | Satara Politics: ..आता कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्षही ‘भाजप’च्या वाटेवर?

Satara Politics: ..आता कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्षही ‘भाजप’च्या वाटेवर?

प्रमोद सुकरे

कराड : नुकत्याच झालेल्या मलकापूर, कराड नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी भाजपची वाट चोखाळली. त्या धक्क्यातून तालुका काँग्रेस सावरत असतानाच आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत कराड उत्तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात भाजपच्या वाटेवर दिसत आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तर रिंगणात उतरवलेले नाहीच; पण भाजप उमेदवारांच्या प्रचारात त्यांची दिसणारी उपस्थिती बरंच काही सांगून जातेय.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडला काँग्रेस विचारांची मोठी परंपरा आहे. म्हणून तर या तालुक्यावर काँग्रेस विचाराचा प्रभाव अनेक वर्षे राहिला. काँग्रेसचेच लोकप्रतिनिधी येथे कार्यरत राहिले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कराड दक्षिणेत काँग्रेसचा, तर उत्तरेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पाहायला मिळाले तेवढेच. पण गत विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलले. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांनी याचा धसका घेत भाजपची वाट धरली. त्यात अनेक माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे.

या साऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले माजी आमदार भास्करराव शिंदे यांचे सुपुत्र, मलकापूरचे उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेसची धुरा वाहणारे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मलकापूर, कराडच्या निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचा ‘हात’ सोडला. भाजपमध्ये जात चक्क त्यांनी नगरपालिकेची उमेदवारीही घेतली. त्यामुळे तालुका काँग्रेसला हा मोठा धक्का बसला. त्यातून काँग्रेस सावरत असतानाच आता कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरातदेखील भाजपच्या वाटेवर दिसत आहेत.

फ्लेक्सवरील छबी बरंच काही सांगून जाते..

कोपर्डे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवारांच्या प्रचारात निवास थोरात सध्या दिसत आहेत. सध्या ते बैठकांना दिसत आहेत. याशिवाय भाजप उमेदवारांच्या फलकावरदेखील त्यांची छबी दिसत आहे. यावरून बरंच काही समजून येतंय ना?

तेव्हापासूनच भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा

विधानसभा निवडणुकीनंतर कराड उत्तरेत असणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. त्या निवडणुकीत सत्ताधारी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी दंड थोपटले. पण, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपच्या किसान मोर्चाचे पदाधिकारी रामकृष्ण वेताळ यांच्या बरोबरीने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी कारखान्यात तिसरे पॅनल रिंगणात उतरवले होते. तेव्हापासूनच ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

Web Title : क्या कराड उत्तर कांग्रेस अध्यक्ष भी भाजपा में शामिल होंगे?

Web Summary : कराड दक्षिण कांग्रेस नेता के भाजपा में शामिल होने के बाद, कराड उत्तर के अध्यक्ष के भी ऐसा करने की अटकलें तेज हैं। स्थानीय चुनावों के बीच भाजपा उम्मीदवारों के लिए उनका समर्थन दल बदलने की अफवाहों को हवा दे रहा है।

Web Title : Karad North Congress President Likely to Join BJP, Following Suit?

Web Summary : After Karad South Congress leader joined BJP, speculation rises about Karad North's president following suit. His support for BJP candidates fuels rumors of switching allegiance amid local elections.