कऱ्हाड-चिपळूण महामार्ग: अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करणार, मनसे तालुकाध्यक्षांचा इशारा; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:55 IST2025-01-23T11:54:55+5:302025-01-23T11:55:32+5:30
कोयनानगर : कऱ्हाड-चिपळूण महामार्गाविरोधातील उपोषणादरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न करता संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते व ...

संग्रहित छाया
कोयनानगर : कऱ्हाड-चिपळूण महामार्गाविरोधातील उपोषणादरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न करता संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते व जनतेची फसवणूक केली आहे. येत्या पंधरा दिवसांत आश्वासनांची पूर्तता न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी दिला. पाटण येथे मनसे कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पाटण शहरप्रमुख चंद्रकांत बामणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोरख नारकर म्हणाले, २३ सप्टेंबर २०२४ रोजी कऱ्हाड-चिपळूण रस्त्याच्या निकृष्ट व दिरंगाई कामाविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, उपोषण स्थगितीनंतर सुमारे साडेतीन महिन्यांमध्ये दिलेल्या आश्वासनामधील कोणतेही काम पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित अधिकारी कामात कसूर करत ठेकेदार कंपनीला पाठीशी घालत आहेत. महामार्गाच्या कामाबाबत पाटणचे महसूल, पोलिस, वनविभागाचे अधिकारी व महामार्ग अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार करुन पुराव्यानिशी माहिती दिली असतानाही संबंधितावर कारवाई होताना दिसत नाही.
महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता येत्या १५ दिवसांत करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा गोरख नारकर यांनी दिला.