मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल!

By Admin | Updated: September 22, 2014 22:04 IST2014-09-22T20:54:22+5:302014-09-22T22:04:10+5:30

महायुतीत अस्वस्थता : माण-खटाव, फलटण मतदारसंघांनी वाढविलाय तिढा

Joining the Basena Mel, Satara in Mumbai! | मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल!

मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल!

सागर गुजर - सातारा  -महायुतीमधील जागावाटपांचा घोळ अजून कायम आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची भलतीच घालमेल सुरु आहे. तिकीट मिळेल या अपेक्षेने पक्षात शिरकाव करणाऱ्या पक्षाबाहेरील इच्छुकांची भीती आधीच होती. आता महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच ताणला गेल्याने मतदारसंघच हातातून निसटतोय काय, या धास्तीने विशेषत: शिवसेना व भाजपच्या जिल्ह्यातील इच्छुकांची झोप उडाली आहे.
भाजप व शिवसेनेच्या युतीमधील पूर्वीच्या करारानुसार सातारा, कऱ्हाड दक्षिण व माण-खटाव मतदारसंघ भाजपकडे तर फलटण, वाई, पाटण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांना सोबत घेऊन महायुती निर्माण झाली. फलटण व कऱ्हाड उत्तर मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’ने तर माण-खटाववर राष्ट्रीय समाज पक्षाने दावा सांगितला आहे. या तीनही मतदारसंघांत भाजप व शिवसेनेला घटकपक्षांच्या बाजूने कौल द्यावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे.
माण-खटाव हातून गेल्यास वाई किंवा कोरेगाव मागून घ्यायचा, अशा हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. वाईतून पुरुषोत्तम जाधव किंवा माजी आमदार मदन भोसले यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. असे झाले तर नुकतेच शिवसेनेत गेलेले महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जर कोरेगाव मिळाला तर माजी आमदार कांताताई नलावडे किंवा महेश शिंदे यांना पालकमंत्र्यांविरोधात उभे करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. मात्र, राजकीय घडामोडीत शिवसेनेचे इच्छुक असणारे दिनेश बर्गे, दत्ताजी बर्गे, हणमंत चवरे यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
माण-खटाव रासपला गेल्यास भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर, ओबीसी विभागाचे राज्य सरचिटणीस धनंजय ओंबासे, जिल्हासरचिटणीस बाळासाहेब खाडे, बाळासाहेब मासाळ, डॉ. महादेव कापसे या इच्छुकांना केवळ ‘मम’ म्हणण्याची वेळ येणार आहे. येथून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले शेखर गोरे यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. साताऱ्यातून दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, रवींद्र पवार यांच्या हालचाली वेगवान आहेत. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या पक्षप्रवेशामुळे या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. वाई किंवा कोरेगावच्या बदल्यात हा मतदारसंघाला शिवसेनेला मिळाला तरी पक्षातील पाखरे आधीच उडून गेले असल्याने या ठिकाणी सेनेला उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक पवार भाजपची उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेत आहेत; मात्र ती मिळाली नाही तरी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने सातारा-जावळीचे वातावरण भलतेच तापले आहे.

‘आयारामांना विरोध’ हाच भाजपचा अजेंडा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका जिल्ह्यातील भाजप निष्ठावंतांनी घेतली आहे. मात्र, भाजपच नव्हे, तर शिवसेनेतही ‘आयात’ उमेदवार अनेक ठिकाणी गर्दी झाली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा प्रवास करणाऱ्या डॉ. दिलीप येळगावकरांनाही अनेकांनी विरोध केला होता. तथापि, ‘निवडून येण्याची क्षमता’ हा निकष लावल्यास अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांतील निष्ठावंतांवर नाराज होण्याची वेळ येऊ शकते.

Web Title: Joining the Basena Mel, Satara in Mumbai!