Satara: डायरीमुळे उलगडला खजिना, खासगी सावकारांकडून एक कोटी १६ लाखांचे दागिने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:14 IST2024-12-06T12:13:54+5:302024-12-06T12:14:44+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; फिर्यादी भारावले, दागिने मिळाले परत

Jewelery worth Rs 1 crore seized from private lenders in Satara | Satara: डायरीमुळे उलगडला खजिना, खासगी सावकारांकडून एक कोटी १६ लाखांचे दागिने हस्तगत

Satara: डायरीमुळे उलगडला खजिना, खासगी सावकारांकडून एक कोटी १६ लाखांचे दागिने हस्तगत

सातारा : खासगी सावकाराकडे एखादी तारण म्हणून गेलेली मालमत्ता परत मिळवणे फार अवघड असते. आयुष्यात कधीच आपली मालमत्ता, माैल्यवान दागिने परत मिळणार नाहीत. असेच यातील पीडितांना वाटते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने हे शक्य करून दाखविले असून, तब्बल एक कोटी १६ लाखांचे १४६ तोळ्यांचे दागिने खासगी सावकारांकडून हस्तगत केले. एवढ्या माेठ्या प्रमाणात सावकारांकडून दागिने हस्तगत करण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

विजय वसंतराव चौधरी, कल्पना विजय चौधरी, अजिंक्य अनिल चौधरी (रा. सदर बझार, सातारा), अशी संशयित खासगी सावकारांची नावे आहेत.

विजय चाैधरी यांचे सराफ दुकान आहे. त्यांच्याकडून मनोज गणपती महापरळे (रा. सातारा) यांनी एक कोटी ९२ लाख रुपये रक्कम घेतली होती. सुरुवातीला रकमेवर दरमहा अडीच टक्के व्याज देण्याचे ठरले होते. त्यानंतर खासगी सावकाराने व्याजाची टक्केवारी दरमहा दहा टक्क्यांवर नेली होती. हे कर्ज देत असताना सावकाराने ६५ तोळे सोन्याचे दागिने व ५० लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण म्हणून घेतला होता. महापरळे यांनी सावकाराला एक कोटी ९२ लाख रुपये मुद्दल व एक कोटी १२ लाख ७७ हजार ५०० रुपये मुद्दल, असे एकूण तीन कोटी ४ लाख ७७ हजार ५०० रुपये परत दिले. त्यानंतर त्यांनी सावकाराकडे तारण म्हणून ठेवलेले दागिने व प्लॉट परत मागितला. परंतु, त्याने ते परत देण्यास नकार दिला.

दुसऱ्या प्रकरणात शकुंतला अशोक शिंदे (रा. सातारा) यांनीही संशयितांकडून १९ लाख ९८ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात संशयिताने ८१ तोळे दागिने तारण म्हणून त्यांच्याकडून घेतले होते.

डायरीमुळे उलगडला खजिना..

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्वतंत्र पथके तैनात केली. या पथकाने संशयित विजय चाैधरी यांच्याकडे तपास सुरू केला. त्यांच्या दुकानामध्ये एक वयस्कर व्यक्ती काम करत होती. त्या व्यक्तीला डायरीमध्ये व्यवहाराच्या नोंदी लिहिण्याची सवय होती. ही डायरी पोलिसांच्या हाती लागली. दागिने कोणी कुणाला कुठे दिले, याची इत्थंभूत माहिती या डायरीत होती. त्या आधारे पोलिसांनी आणखी दोन सराफांना ताब्यात घेतले. डायरीमुळे दागिन्यांचा खजिना पोलिसांच्या हाती लागला.

Web Title: Jewelery worth Rs 1 crore seized from private lenders in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.