साताऱ्यात आयटी पार्क व कौशल्य केंद्र होणार : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:52 IST2025-04-05T12:51:56+5:302025-04-05T12:52:51+5:30

सातारा एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचे लोकार्पण

IT park and skill center to be established in Satara says Uday Samant | साताऱ्यात आयटी पार्क व कौशल्य केंद्र होणार : उदय सामंत

साताऱ्यात आयटी पार्क व कौशल्य केंद्र होणार : उदय सामंत

सातारा : साताऱ्यात आयटी पार्क व्हावे, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनीही जागा सुचविल्या आहेत. याबाबत दोघांशीही चर्चा केली असून, एका ठिकाणी आयटी पार्क होईल, तर दुसऱ्या ठिकाणी स्कील सेंटर सुरू होईल. याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करून स्कील सेंटरही सुरू करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सातारा येथे ‘मास’ भवनच्या सर धनाजीशा कूपर सभागृहात मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा आणि एमआयडीसी यांच्या विद्यमाने आयोजित उद्योजक संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योजक फारोख कूपर, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, मुख्य अभियंता नितीन वनखंडे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, ‘साताऱ्यात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय व्हावे, असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार प्रादेशिक अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. या सुसज्ज कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काॅर्पोरेट पद्धतीने कामे केली पाहिजेत. उद्योजकांना हेलपाटे मारायला लागू नयेत. म्हसवड येथील नव्याने होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये मोठमोठे प्रकल्प येणार आहेत. यामध्ये संरक्षण, फार्मा पार्क संबंधित प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न केले जातील. चित्रपटसृष्टीलाही उद्योगाचा दर्जा देण्यात येणार असून, त्यातून चांगली रोजगारनिर्मिती होईल.’

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा एमआयडीसीची वाढ अत्यंत महत्त्वाची असून वर्णे, निगडी व जाधववाडी येथील भूसंपादनाचे नोटिफिकेशन झालेले आहे. बागायती जमीन वगळून डोंगराकडची जमीन घेऊन एमआयडीसी वाढवावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये उपलब्ध असणारी जमीन यासाठी मिळविण्यात यावी व त्या ठिकाणी आयटी पार्क उभे करावे. नागेवाडी लिंब खिंड येथील ४६ हेक्टर जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असल्याने एमआयडीसीकडे हस्तांतरित व्हावी. साताऱ्याला वीज, पाणी मुबलक आहे. देशाबाहेरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात येण्यासाठी सकारात्मक असतात. त्यामुळे उद्योग वाढीत सातारा मागे राहू नये.’

Web Title: IT park and skill center to be established in Satara says Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.