Satara-Local Body Election: मलकापुरात अवैध उमेदवार कोर्टाकडून पुन्हा वैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:06 IST2025-11-26T16:04:57+5:302025-11-26T16:06:20+5:30
दोन प्रभागांत नाट्यमय घडामोडी

Satara-Local Body Election: मलकापुरात अवैध उमेदवार कोर्टाकडून पुन्हा वैध
मलकापूर : मलकापुरात दोन प्रभागांत एकाच पक्षातील उमेदवारीबाबत नाट्यमय घडामोडी घडल्या. १८ नोव्हेंबरच्या आदेशानुसार दोन प्रभागांतील अवैध ठरवलेल्या उमेदवारांनी कोर्टात आव्हान दिले. त्याचा निकाल लागला असून, पर्यायी अवैध उमेदवारांना कोर्टाने वैध ठरवले आहे. त्यामुळे एका प्रभागात उमेदवारीत बदल झाला, तर एका प्रभागात ‘जैसे थे’ परिस्थिती राहिली आहे.
मलकापूर (ता. कराड) येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग ८ अ मधून भाजप पक्षाच्या वतीने स्वाती समीर तुपे व गीता नंदकुमार साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पक्षाने दिलेल्या एबी फॉर्ममध्ये स्वाती तुपे या पसंती क्रमांक एकच्या, तर गीता साठे या पसंती क्रमांक दोनच्या उमेदवार निर्देशित केल्या होत्या. उमेदवारी छाननीच्या वेळी मंगळवारी (दि. १८) आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे यांनी एबी फॉर्ममधील एक नंबरच्या स्वाती तुपे यांना वैध ठरवलं, तर गीता साठे यांना अवैध ठरवले होते. या निर्णयाला गीता साठे यांनी जिल्हा कोर्टात आव्हान दिले होते.
पर्यायी उमेदवार ठरला वैध...
त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक ४ अ मध्ये भाजपकडून सुनील प्रल्हाद खैरे व सचिन संपत खैरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये भाजपच्या एबी फॉर्मवर सुनील खैरे एक नंबरला, तर पर्यायी उमेदवार म्हणून सचिन खैरे यांना निर्देशित केले होते. या प्रभागातही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पर्यायी उमेदवार सचिन खैरे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. या निर्णयाविरोधात त्यांनीही जिल्हा कोर्टात अपील केले होते. अपिलात गेल्यामुळे अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली होती. तत्पूर्वीच सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा कोर्टाने याबाबत निकाल दिला. त्यानुसार पर्यायी उमेदवार कोर्टाने वैध ठरवल्याचा निकाल देण्यात आला. त्यामुळे मंगळवारी मलकापुरातील या दोन्ही प्रभागात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.