Interstate gang arrested for stealing petrol by breaking pipeline | पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

ठळक मुद्देपाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत सात जणांना अटक, सासवडच्या शेतमालकाचाही समावेश

लोणंद  : सासवड (ता. फलटण ) या भागातील एच. पी. कंपनीची पेट्रोलची पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा लोणंद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत लोणंद पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिल हरिशंकर पाठक ( रा. मुळगाव पिंडराई पटखान जि. वाराणसी उत्तर प्रदेश ) बाळू अण्णा चौगुले (रा. रामनगर चिंचवड, पुणे ) मोतीराम शंकर पवार ( रा. गवळीमाता भोसरी पुणे), इस्माईल पीर मोहम्मद शेख (रा. डी मार्ट शेजारी पिंपरी पुणे), शिवाजी कानडे ( रा. वाल्हेकरवाडी चिंचवड), दत्तात्रय सोपान लोखंडे (रा. सासवड), ज्ञानदेव नामदेव जाधव (रा. दालवडी ता. फलटण) यांचा समावेश आहे. दत्तात्रय लोखंडे हा जमीन मालक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सासवड गावच्या हद्दीतून जमिनीच्या खालून जाणारी एचपी कंपनीची पेट्रोलची पाईपलाईनला फोडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी ही घटना घडली होती. यावेळी दोन हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरल्याने जमिनीत मुरले तसेच पेट्रोल आजूबाजूच्या विहिरीत उतरल्यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होऊन कंपनीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.

पेट्रोल चोरीच्या या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत आंतरराज्य टोळीतील सात आरोपी निष्पन करून त्यांना गुन्हे शाखा क्रमांक दोन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.

इंटररोगेशन स्किलचा वापर करून यामधील संशयितांकडे तपास केला असता सातही आरोपींनी सदरचा गुन्हा कबूल केला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या आरोपींनी अशा प्रकारचे पेट्रोल चोरी सारखे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे अजयकुमार बन्सल यांनी सांगितले असून पेट्रोल चोरीच्या गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

Web Title: Interstate gang arrested for stealing petrol by breaking pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.