Satara Crime: संजय शेलार यांच्या खुनाचे कारण आले समोर, अरुण कापसे याच्यासह पाचजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:53 IST2025-01-24T14:49:22+5:302025-01-24T14:53:29+5:30
अरुण कापसेला आश्रय देणाऱ्यांचाही समावेश

Satara Crime: संजय शेलार यांच्या खुनाचे कारण आले समोर, अरुण कापसे याच्यासह पाचजणांना अटक
सातारा : अंधारी, ता. जावळी येथील संजय गणपत शेलार यांच्या खूनप्रकरणात मुख्य सूत्रधार अरुण कापसे (वय ५६, रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा) याच्यासह एकूण पाचजणांना मेढा पोलिसांनी अटक केली. यामध्ये अरुण कापसे याला मदत करणाऱ्या व आश्रय देणाऱ्या दोघांचा समावेश आहे. अरुण कापसे याच्या सांगण्यावरून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
रामचंद्र तुकाराम दुबळे (वय ३७, रा. मतकर काॅलनी, शाहूपुरी, ता. सातारा), विकास अवधूत सावंत (३५, रा. कासार बिल्डिंग, मोळाचा ओढा, सातारा), अजिंक्य विजय गवळी (३६, रा. शनिवार पेठ, नागोबा कट्टा, मिरज, जि. सांगली), प्रशांत मधुकर शिंत्रे (३२, रा. बेळंकी, ता. मिरज, जि. सांगली) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फळणी, ता. जावळी येथे २ जानेवारी रोजी संजय शेलार यांचा मृतदेह आढळून आला होता. मेढा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मोबाइल सीडीआरच्या तांत्रिक विश्लेषण करून संजय शेलार यांचा खून करणारा आरोपी रामचंद्र दुबळे याला १६ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली. पोलिस कोठडीत असताना त्याने अरुण कापसे याच्या सांगण्यावरून संजय शेलार याचा मी खून केला आहे. अशी कबुली दिली. या खुनाचा कट अरुण कापसे, रामचंद्र दुबळे, विकास सावंत यांनी मिळून रचला असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी १८ जानेवारी रोजी बाऊन्सर असलेल्या विकास सावंत याला अटक केली. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे वर्ग केल्यानंतर त्यांनी तत्काळ चार पोलिस पथके नेमून गुन्ह्यातील आरोपी अरुण कापसे याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊन त्याला मिरज येथून अटक केली. तसेच अरुण कापसे याला पळून जाण्यासाठी मदत करणारा अजिंक्य गवळी व लपण्यासाठी आश्रय देणारा प्रशांत शिंत्रे यांनाही दि. २२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. सर्व संशयितांना मेढा न्यायालयाने ७ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
खुनाचे ‘हे’ कारण आले समोर
या खुनाचे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले असून, अरुण कापसे हा महिलेशी लगट करून जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तसेच बांधकामावरील कामगारांच्यासमोर कापसे याला संजय शेलार हा शिवीगाळ करत होता. याचा राग मनात धरून संजय शेलार यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.