तिघांच्या बदल्यात १०० सैनिक पाठवतोय माझा सातारा !, गेल्या आठ दिवसांत तीन जवानांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:32 IST2026-01-15T13:32:07+5:302026-01-15T13:32:32+5:30
सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने हेलावले समाजमन

तिघांच्या बदल्यात १०० सैनिक पाठवतोय माझा सातारा !, गेल्या आठ दिवसांत तीन जवानांना वीरमरण
सचिन काकडे
सातारा : तीन जवानांच्या हुतात्म्याने अवघा सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला. एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांनी जिल्हावासीयांचे डोळे पाणावले. याच दुःखाच्या सावटात साताऱ्याच्या लढाऊ बाण्याने अशी गरुडझेप घेतली की, त्याची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. जिल्ह्यातील शंभराहून अधिक तरुण सैन्यदलात भरती झाल्याने ‘तिघांच्या बदल्यात शंभर मुले पाठवतोय माझा सातारा जिल्हा’ असा भावनिक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या पोस्टने समाजमन हेलावले आहे.
गेल्या आठ दिवसांत साताऱ्याच्या तीन जवानांना वीरमरण आले. या दुःखद घटनेने जिल्हा हळहळला असला तरी, इथल्या मातीचा सैन्य भरतीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. याउलट, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याचा निर्धार करत शंभराहून अधिक तरुणांनी लष्करी परीक्षेत यश मिळवून सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
कोल्हापूर सैन्य भरतीचा (एआरओ) निकाल मंगळवारी जाहीर होताच, सोशल मीडियावर सातारकरांच्या स्वाभिमानाचे मेसेज व्हायरल झाले. ‘तिघांच्या बदल्यात शंभर मुले पाठवतोय माझा सातारा जिल्हा’ या सोशल मीडियावरील पोस्टने आपला जिल्हा लढवय्या आहे, तो खचून न जाता नव्याने कशी उभारी घेतो, असा संदेश देण्यात आला.
दु:ख आणि आनंदही
वीर जवानांना श्रद्धांजली वाहतानाच, नव्याने भरती झालेल्या जवानांचे नेटकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. एका बाजूला अंत्यविधीचा शोक आणि दुसऱ्या बाजूला भरतीचा आनंद, अशा अत्यंत विदारक पण अभिमानास्पद परिस्थितीत साताऱ्याने आपली लष्करी परंपरा सिद्ध केली असल्याचा अभिप्रायही नेटकरी देत आहेत.
या जवानांनी गाजवले शौर्य...
जवान विकास गावडे (रा. बरड, ता. फलटण) : सुदान येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेवर असताना त्यांनी कर्तव्य बजावताना वीरगती पत्करली.
जवान अभिजित माने (रा. भोसे, ता. कोरेगाव) : २०१३ पासून देशसेवा बजावत असलेल्या अभिजित माने यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले.
जवान प्रमोद जाधव (रा. दरे, ता. सातारा) : सुटीवर गावी आलेले असताना अपघाती निधनाने त्यांनी जगाचा निरोप घेतला.