माणमध्ये राष्ट्रवादीला चिठ्ठीची साथ, फलटणला स्वकियांकडून विश्वासघात; सातारा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीत राजकीय नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:42 IST2026-03-17T13:41:52+5:302026-03-17T13:42:18+5:30

माणमध्ये भाजपला धक्का...

In the election of Panchayat Samiti Chairman in Satara district, NCP gets support from the letter in Maan, Phaltan is betrayed by its own people | माणमध्ये राष्ट्रवादीला चिठ्ठीची साथ, फलटणला स्वकियांकडून विश्वासघात; सातारा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीत राजकीय नाट्य

माणमध्ये राष्ट्रवादीला चिठ्ठीची साथ, फलटणला स्वकियांकडून विश्वासघात; सातारा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीत राजकीय नाट्य

सातारा : जिल्ह्याच्या अकरा पंचायत समिती सभापतींच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)ला माणमध्ये समसमान मतदानानंतर चिठ्ठी काढल्यानंतर नशिबाची साथ मिळाली. फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या सभापतीने ऐनवेळी विश्वासघात करत तीनही सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे फलटण सभापती निवडीवर राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे.

सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतीपदांच्या निवडणुका सोमवारी झाल्या. यातील फलटण आणि माणमध्ये समान बलाबलामुळे उत्कंठा वाढली होती. फलटणला पंचायत समितीमध्ये महायुतीतील शिंदेसेनेचे ८, भाजपचे ५ व राष्ट्रवादी ३ असे १६ सदस्य निवडून आले होते. निवडणुकीत विरोधात लढणाऱ्या शिंदेसेनेकडे ८ सदस्य होते. तसेच भाजप व राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवल्याने त्यांच्याकडेही ८ सदस्य होते.

ऐनवेळी शिंदेसेनेचे संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजकीय सुज्ञपणा दाखवला. राष्ट्रवादीच्या शिवांजली भोसले यांच्या निवडीवेळी शिंदेसेनेने उमेदवार दिला नाही, तर शिंदेसेनेच्या अमोल सस्ते यांच्या उपसभापतीपदाला भाजपकडून हिरवा कंदील मिळाला. मात्र, सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीचे तीनही सदस्य भाजपच्या छावणीत दाखल झाले. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना हा मोठा धक्का असून, फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीची सदस्य संख्या शून्य होणार आहे.

माणमध्ये भाजपला धक्का...

माण पंचायत समितीच्या एकूण दहा जागांपैकी भाजपचे ५, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ५ सदस्य होते. मतदानावेळी दोन्ही बाजूने समसमान झाली. त्यानंतर नियमानुसार चिठ्ठी काढली. या चिठ्ठीने राष्ट्रवादीला कौल दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम शिंगाडे यांची सभापतीपदी, तर प्रियंका जगदाळे यांची उपसभापतीपदी वर्णी लागली. याठिकाणी मात्र भाजपला धक्का बसला.

रणजितसिंह यांच्या विचाराचे सभापती...

राष्ट्रवादी (अजित पवार)चे विद्यमान आमदार सचिन पाटील हे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याच विचारांचे आहेत, तर तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनीही भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे ऐनवेळी भाजपवासी झालेले राष्ट्रवादीचे तीनही सदस्य हे रणजितसिंह निंबाळकर यांच्याच विचारांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद निवडीला सतर्कता

राष्ट्रवादी काँग्रेसला आता जिल्हा परिषद निवडीवेळी सतर्कता बाळगावी लागणार आहे. तथापि, व्हिपचे अधिकार मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे असल्याने चिंता नसल्याचे मत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

जिल्ह्यातील पदाधिकारी असे...

तालुका - सभापती - उपसभापती

  • सातारा - महेश गाडे - सुषमा जाधव
  • महाबळेश्वर - शकुंतला चोरमले - संजय मोरे
  • फलटण - शिवांजली भोसले - अमोल सस्ते
  • माण - विक्रम शिंगाडे - प्रियंका जगदाळे
  • खटाव - वनिता दुबळे - रेश्मा शेडगे
  • जावळी - साैरभ शिंदे - गोरख महाडिक
  • खंडाळा - छाया जाधव - संतोष वीर
  • कराड - नंदा यादव - अनिता वेताळ
  • कोरेगाव - रूपाली गुरव - रवींद्र पवार
  • वाई - विक्रांत डोंगरे - वर्षा जगताप
  • पाटण - सविता पवार - विजय पवार

Web Title : सतारा में राजनीतिक नाटक: पंचायत चुनावों में एनसीपी को मिली सफलता, कुछ में हार।

Web Summary : सतारा जिला परिषद में राजनीतिक बदलाव देखे गए क्योंकि एनसीपी ने मैन में लॉटरी के माध्यम से जीत हासिल की लेकिन फलटन में विश्वासघात का सामना करना पड़ा, सदस्यों ने भाजपा में दलबदल किया। पंचायत समिति पदों के चुनावों में स्थानीय शक्ति समीकरणों पर अंतर-पार्टी गतिशीलता का पता चला।

Web Title : Political drama in Satara: NCP wins some, loses some in Panchayat elections.

Web Summary : Satara Zilla Parishad saw political shifts as NCP won in Man via lottery but faced betrayal in Phaltan, with members defecting to BJP. Elections for Panchayat Samiti positions revealed intra-party dynamics impacting local power equations.