Satara: फलटण डॉक्टर युवती आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती, राज्य शासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:11 IST2025-12-06T14:10:34+5:302025-12-06T14:11:07+5:30
निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापना, संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत

Satara: फलटण डॉक्टर युवती आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती, राज्य शासनाचा निर्णय
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीची सातत्याने मागणी होत होती. अखेर राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी गोपाल बदने व प्रशांत किसन बनकर (रा. फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. सध्या त्यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष, विविध सामाजिक संस्था व नातेवाइकांकडून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी शासनाने निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत
डाॅक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित असलेले बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाल बाळासाहेब बदने (रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड, सध्या रा. बिरदेवनगर, ता. फलटण) व प्रशांत किसन बनकर (रा. लक्ष्मीनगर, फलटण) हे दोघेही संशयित न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.