सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:57 IST2025-07-02T13:57:12+5:302025-07-02T13:57:38+5:30

जून महिन्यात दमदार पाऊस : कोयनेला २४ तासांत ८७ मिलिमीटरची नोंद

Heavy rains in Satara district have resulted in water storage of more than 81 TMC in six major projects in the western region | सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार 

सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार 

सातारा : जिल्ह्यात जून महिन्यातच दमदार पाऊस झाल्याने पश्चिम भागातील प्रमुख सहा प्रकल्पांत ८१ टीएमसीहून अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. बलकवडी वगळता इतर पाच धरणे ही ५१ ते ७३ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगरला ८७ मिलिमीटर झाला आहे.

पावसाळ्याचा एक महिना संपला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला फायदा झाला. तसेच छोटे पाणी प्रकल्पही ओसंडून वाहू लागले आहेत. तर पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखे मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या आणि शेती पाण्याचीही चिंता मिटलेली आहे. त्यातच जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरूच आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे ६१ आणि महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने पाणी आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास धरणात सुमारे ३० हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा ५३.६९ टीएमसी झाला होता. ५१.०१ टक्केवारी पाणीसाठ्याची झालेली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक पाणीसाठा झालेला आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील प्रमुख प्रकल्पातही मोठा पाणीसाठा आहे.

धोम धरणात ८.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण सुमारे ६१ टक्के भरलेले आहे. तर बलकवडी धरणात ३२ टक्केच साठा आहे. सध्या १.२९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरण क्षेत्रात पावसाचा जोर अजून कमी आहे. कण्हेर धरणातही ६.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ६८ टक्क्यांवर भरलेले आहे. उरमोडी धरणातही ७३ टक्के साठा झाला असून ७.२५ टीएमसी धरण भरले आहे. पाटण तालुक्यातही पाऊस पडत आहे. यामुळे तारळी धरणात पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास तारळी धरणात ३.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण जवळपास ६७ टक्के भरलेले आहे.

धरणांची १४८ टीएमसी क्षमता..

जिल्ह्यात अनेक पाणी प्रकल्प आहेत. पण, कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे सहा प्रकल्प प्रमुख आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीहून अधिक आहे. यावर्षी वेळेत आणि दमदार पाऊस झाला. त्यामुळे सध्या या सहाही धरणांत ८१.२७ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे या धरणांत सध्या ५४ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. पावसाळ्याचे तीन महिने बाकी आहेत. यामुळे या प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होणार आहे.

Web Title: Heavy rains in Satara district have resulted in water storage of more than 81 TMC in six major projects in the western region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.