सातारा जिल्ह्यात जोर’धार’, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:23 IST2025-07-16T13:22:33+5:302025-07-16T13:23:06+5:30

दरवाजे साडे तीन फुटांवर

Heavy rain in Satara district, water release from Koyna dam increased, old Sangamnagar bridge submerged | सातारा जिल्ह्यात जोर’धार’, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली 

सातारा जिल्ह्यात जोर’धार’, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणातही आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे आता दीड वरुन साडे तीन फुटापर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजातून ९ हजार ३०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एकूण ११ हजार ४०० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीपातळीत वाढ झाल्याने जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस आहे. पश्चिम भागात तर एकसारखा पाऊस होत आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही तीन दिवसांपासून संततधार आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ४४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे ८४ आणि महाबळेश्वरला १३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली. 

सकाळच्या सुमारास २६ हजार ४०४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर ७७.२६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी आणि मान्सूनचा उर्वरित कालावधी विचारात घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाने दरवाजातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी १२ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरुन साडे तीन फुटापर्यंत वर उचलण्यात आले आहेत. त्यामुळे ९ हजार ३०० क्यूसेक विसर्ग दरवाजातून होऊ लागला आहे. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच आहेत. त्यातूनही २ हजार १०० क्यूसेक विसर्ग केला जातोय.

यामुळे धरणातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

प्रमुख प्रकल्प ७४ टक्के भरले; १२,३९३ क्यूसेक विसर्ग..

जिल्ह्याच्या पश्चिम भागातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणात ११०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ही धरणे ७४.४७ टक्के भरलीत. पावसाळ्याचा विचार करुन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चार धरणांतून विसर्ग सुरू आहे. दुपारच्या सुमारास या धरणातून एकूण १२ हजार ३९३ क्यूसेक विसर्ग केला जात होता. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.

Web Title: Heavy rain in Satara district, water release from Koyna dam increased, old Sangamnagar bridge submerged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.