प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 23:34 IST2025-06-30T23:33:02+5:302025-06-30T23:34:01+5:30
ती तरुणी कोण? मोबाइल उलगडणार रहस्य...

AI Generated Image...
सातारा : प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत लॉजमधून बाहेर पडताना दिसताच प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील उपनगरात शनिवारी सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहराजवळील संभाजीनगर परिसरात एक १८ वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पहिल्या वर्षाला अँडमिशनही घेतले होते. त्याच काॅलेजमधील बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकत्र फिरायचे, भेटायचे. त्यातच शनिवारी दुपारी त्याची प्रेयसी दुसऱ्या एका मुलासोबत लाॅजमध्ये गेली होती. ती मुलासोबत लाॅजमधून परत येताना संबंधित प्रियकर तरुणाने तिला पाहिले. यामुळे तो अस्वस्थ झाला. यानंतर त्याने त्याच्या मोठ्या भावाला फोन केला. माझे कोमल (बदललेले नाव) सोबत प्रेमसंबंध आहेत; पण ती आज मला दुसऱ्या मुलासोबत लाॅजमधून बाहेर पडताना दिसली आहे. तिने मला धोका दिला आहे. मी आता जगणार नाही, असे म्हणून त्याने फोन कट केला.
या प्रकारानंतर मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली. भावाच्या फोनवर त्याने फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन बंद केला होता. त्यामुळे अन्य एका मित्राला सोबत घेऊन मोठ्या भावाने घराच्या आजूबाजूला लहान भावाचा शोध घेतला. परंतु तेथेही तो सापडला नाही. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास जनाई मळाई डोंगराच्या पायथ्याजवळ त्याचा भाऊ शोध घेत तेथे गेला. त्यावेळी ओढ्यातील जांभळीच्या झाडाला नायलाॅनच्या दोरीने लहान भावाने गळफास घेतल्याचे मोठ्या भावाच्या निदर्शनास आले. यानंतर याची माहिती सातारा शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
ती तरुणी कोण? मोबाइल उलगडणार रहस्य... -
संबंधित मृत तरुणाचा मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याच्या मोबाइलमधून संबंधित तरुणीची ओळख पटणार आहे. ती तरुणी कोण आहे. याची माहिती पोलिस घेत आहेत.