जीबीएस आजाराचा साताऱ्यातही शिरकाव; यंत्रणा अलर्ट मोडवर, पालकमंत्र्यांनी काय सूचना दिल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:31 IST2025-02-06T08:27:07+5:302025-02-06T08:31:15+5:30
शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जीबीएस आजाराचा साताऱ्यातही शिरकाव; यंत्रणा अलर्ट मोडवर, पालकमंत्र्यांनी काय सूचना दिल्या?
Satara Shambhuraj Desai: ‘जीबीएस’ आजाराचे संशयित रुग्ण सातारा जिल्ह्यातही आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शंभूराज देसाई म्हणाले की, "सातारा जिल्ह्यात जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, जिल्हा रुग्णालयात जीबीएस संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र १० बेड आरक्षित करावे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास डॉक्टर उपस्थित राहतील अशी खबरदारी घ्यावी, जिल्ह्यात कुठेही दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी, "अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.
आतापर्यंत एकूण सात रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलवले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
दरम्यान, या बैठकीला सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलपे आदी व्हीसीद्वारे उपस्थित होते.