धूमस्टाईल चोरट्यांच्या टोळीचा छडा

By Admin | Updated: September 15, 2014 23:26 IST2014-09-15T21:23:41+5:302014-09-15T23:26:05+5:30

दोन आरोपी अटकेत : वृद्ध महिलांचे दागिने हिसकावले, सहा गुन्ह्यांची कबुली

Gang of thieves | धूमस्टाईल चोरट्यांच्या टोळीचा छडा

धूमस्टाईल चोरट्यांच्या टोळीचा छडा

उंडाळे : साळशिरंबे, ता. कऱ्हाड परिसरात धूमस्टाईलने लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. पथकाने आत्तापर्यंत टोळीतील दोघांना अटक केली असून, शिराळ्यातील एकाला रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.
दीपक विश्वास देवकर (वय २३), विशाल सुरेश उथळे (वय २०, दोघेही रा. भाटवाडी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळशिरंबे परिसरात गत काही दिवसांपासून धूमस्टाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अशातच दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गावातील नर्मदा तुकाराम सावंत (वय ६५) ही महिला नागझरी शिवारात जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन युवक त्याठिकाणी आले.
नर्मदा सावंत यांच्याजवळ त्यांनी दुचाकी थांबविली व नजीकच्या एका शेतजमिनीकडे हात करून संबंधित जमीन कोणाच्या मालकीची आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी नर्मदा यांनी जमिनीच्या मालकाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित युवक दुचाकीवरून काही अंतरावर गेले. तेथून परत येत त्यांनी नर्मदा यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सुमारे १४ हजार किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. नर्मदा सावंत यांनी आरडाओरडा केला. मात्र, परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही.
दरम्यान, या घटनेनंतर तासाभरातच परिसरात आणखी एका ठिकाणी या टोळीने हातसफाई केली. गावापासून काही अंतरावर साळशिरंबे-पाचुंब्री मार्गावरून जनावरे घेऊन शेताकडे निघालेल्या सुमन अधिक साठे (वय ५८) या महिलेच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सुमारे १४ हजार किमतीचे मंगळसूत्र धूमस्टाईल चोरट्यांनी हिसकावले व तेथून पोबारा केला.
या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण असतानाच शनिवारी या टोळीतील दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. (वार्ताहर)

Web Title: Gang of thieves