Phaltan Municipal Council Election Result 2025: फलटणमध्ये रामराजेंच्या तीस वर्षांच्या सत्तेला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लावला सुरुंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:26 IST2025-12-22T17:24:35+5:302025-12-22T17:26:13+5:30
Phaltan Nagarpalika Election Result 2025: नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक-निंबाळकर

Phaltan Municipal Council Election Result 2025: फलटणमध्ये रामराजेंच्या तीस वर्षांच्या सत्तेला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लावला सुरुंग
फलटण : फलटण पालिकेचे तब्बल तीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत माजी खासदार रणजितसिंह यांनी रामराजे यांची सत्ता उलथवून लावत सलग आठव्यांदा पालिका ताब्यात घेण्याचे राजे गटाचे स्वप्न भंगले. शेवटपर्यंत अटीतटीची झालेल्या या लढतीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांचा ६०० मतांनी पराभव केला.
पहिल्या फेरीपासून अतिशय कमी फरकाने समशेरसिंह यांनी आघाडी घेतली होती. तिसऱ्या व चौथ्या फेरीपर्यंत समशेरसिंह यांनी तब्बल सातशे मतांची आघाडी घेतली. यामुळे शेवटच्या फेरीत मताधिक्य भरून काढण्याची संधी अनिकेतराजे यांना मिळाली नाही. पाचव्या फेरी अखेर समशेरसिंह नाईक-निंबाळकर सहाशे मतांच्या आघाडीने फलटणचे नवे नगराध्यक्ष झाले.
वाचा : साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री
फलटण नगरपालिकेवर गेली चार वर्षे प्रशासक राज होते. या काळात फलटणच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाले. त्यात राजे गटाच्या तब्बल तीस वर्षांच्या सत्तेला जनतेने सपशेल नाकारले असून, अनेक नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत मतदारांनी संधी दिली आहे
नगराध्यपदी समशेरसिंह
फलटण नगराध्यपपदी समशेरसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाले आहेत. फलटण नगरपालिकेत १५ वर्षे विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिले. थेट जनतेशी असणारा दांडगा संपर्क, तरुणांमध्ये असणारी लोकप्रियता, कामाची धडाडी झाली. यामुळे त्यांचा विजय झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
अशोक जाधव यांचा धक्कादायक पराभव
फलटण पालिकेचे तीन वेळा नगरसेवक असणारे गटनेते अशोकराव जाधव यांचा पांडुरंग गुंजवटे यांनी धक्कादायक पराभव केला. अशोक जाधव यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
दोन मतांनी विजयी
फलटण येथील प्रभाग सहामधील किरण देवदास राऊत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी दीपक कुंभार यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. अतिशय घासून झालेल्या या लढतीत किरण राऊत यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली.
फलटण पालिकेत पक्षीय बलाबल
खासदार गट
भाजप १२
राष्ट्रवादी अजित पवार गट ४
अपक्ष २
राजे गट
शिवसेना ७
कृष्णा भीमा आघाडी १
काँग्रेस १