Satara: दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या कोल्हापुरातील पाचजणांच्या मुसक्या आवळल्या, शिरवळ पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 17:19 IST2024-06-27T17:18:17+5:302024-06-27T17:19:40+5:30
सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara: दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या कोल्हापुरातील पाचजणांच्या मुसक्या आवळल्या, शिरवळ पोलिसांची कारवाई
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शिरवळ पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान ताब्यात घेतले. तौसिफ दस्तगीर बागवान (वय-२३), कृष्णात प्रकाश पोतेकर (२६), आकाश अंकुश घाडगे (२५), विक्रम दीपक सोनवले (२२), सुरज महादेव पाटील (२५, सर्व रा. इचलकरंजी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर घटना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गस्त वाढवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान शिरवळ पोलिसांना रात्रग्रस्तवेळी महामार्गालगत एका ऑटोमोबाईल दुकानाशेजारी कार व काही युवक थांबल्याचे दिसले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने मदतीसाठी आणखी पोलिस कर्मचारी बोलावून संशयितांना ताब्यात घेतले.
यावेळी पळून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून ताब्यात घेत विचारपूस केली. या युवकांकडून लोखंडी कटर, लोखंडी कटावणी, मिरची पूड, मोबाईल अशा संशस्यास्पद वस्तू मिळून आल्याने हे युवक रामेश्वर ऑटो गॅरेज या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे असणारी कार व साहित्य असा एकूण ३ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सहाय्यक फौजदार धरमसिंग पावरा, पोलीस अंमलदार नितीन नलावडे, गिरीश भोईटे, विजय शिंदे, अजित बोराटे, संग्राम भोईटे, सुरज चव्हाण व गृहसुरक्षा दलाचे जालिंदर वेळे, रामदास ननावरे यांनी केली.