Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेला ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती

By हणमंत पाटील | Updated: February 14, 2026 17:57 IST2026-02-14T17:56:53+5:302026-02-14T17:57:20+5:30

गट सदस्यांच्या नोंदणीच्या हालचाली

Fearing that faction members should not be split up to form a government in the Satara Zilla Parishad, Shinde Sena and NCP Ajit Pawar faction leaders have moved to register faction members | Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेला ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती

Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेला ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती

हणमंत पाटील

सातारा : राज्यातील सत्ताधारी भाजप कोणत्याही वेळी काहीही करू शकते. त्यांनी ‘ऑपरेशन लोटस’ राबवून आपल्या गट सदस्यांची ‘फोडा-फोडी’ करू नये. यामुळे धास्तावलेली शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गट सदस्यांच्या नोंदणीच्या हालचाली शुक्रवारी (दि. १३) तीव्र केल्या.

जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणूक ‘स्वबळा’वर लढवून सत्ता स्थापनेचे मनसुबे आखले होते. त्यासाठी सर्वाधिक ६१ जागा स्वतंत्रपणे लढविल्या. मात्र, केवळ २७ जागांवरच त्यांना यश आले. मात्र, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला २०, शिंदेसेनेला १५ जागांवर विजय मिळाला. शिवाय निवडणुकीच्या प्रचारातही मित्र पक्षांच्या नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी टार्गेट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व राष्ट्रवादीचे (शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १२) रात्री साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास पक्षाच्या गट सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर भाजपकडून गट सदस्यांची ‘फोडा-फोडी’ होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने पक्षाच्या सदस्यांनी नोंदणीच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, शिंदेसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पक्षाच्या गट सदस्यांची दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. १३) तातडीने बैठक घेतली. यावेळी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’च्या भीतीने सर्व सदस्यांच्या स्वाक्षरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने नोंदणी करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

असा आहे फॉर्म्युला...

राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या प्राथमिक बैठकीत जिल्हा परिषद सत्ता स्थापनेविषयी निकाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्राथमिक चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद शिंदेसेनेकडे द्यायचे. अध्यक्षपदाच्या बदल्यात महत्त्वाच्या समित्या शिंदेसेनेला द्यायच्या, अशा फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शिवेंद्रसिंहराजे यांचा ‘धुरंधर’पणा...

सार्वजनिक बांधकाममंत्री शिंवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी भेट झाली. यावेळी ‘‘आम्ही पालकमंत्र्यांच्या पालकत्वाखाली काम करीत आहोत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ते तयार असतील, तर आम्ही त्यांना मिठी मारायलाही तयार आहोत,” अशी मिश्कील टिप्पणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. त्यावरून अडचणीच्या काळात एक पाऊल मागे घेऊन दोन पावले पुढे जाण्याच्या त्यांच्या ‘धुरंधर’पणाविषयी कार्यकर्त्यांत चर्चा रंगली.

‘रामराजे’ यांची ‘चाणक्यनीती’...

निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी व शिंदेसेना एकत्र येण्याच्या फॉर्म्युल्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ‘कोयना दौलत’ बंगल्यावर ‘चाय पे चर्चा’ झाली. त्यामागे माजी मंत्री व आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांची ‘चाणक्यनीती’ होती. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी शिंदेसेना व राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढली नाही. उलट भाजपच्या विरोधात दोन्ही पक्षांनी अप्रत्यक्षरीत्या एकमेकांना मदत केल्याचे निकालावरून दिसून आले.

मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांची भेट...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी मुंबईत भेट घेतली. यावेळी सातारा, सोलापूरसह राज्यातील जिल्हा परिषदेतील महायुतीच्या सत्तास्थापनेविषयीचे डावपेच व जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या तारखांविषयी चर्चा झाली असल्याचे भाजपमधील त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले.

Web Title: Fearing that faction members should not be split up to form a government in the Satara Zilla Parishad, Shinde Sena and NCP Ajit Pawar faction leaders have moved to register faction members