शेतकऱ्याची मुले दत्तक; उचलला शिक्षणाचा भार

By Admin | Updated: August 20, 2016 22:09 IST2016-08-20T22:02:27+5:302016-08-20T22:09:30+5:30

शिवसैनिकांची सामाजिक बांधिलकी : दहीहंडी उत्सव रद्द करून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत

Farmer's children adopt; Loads of education | शेतकऱ्याची मुले दत्तक; उचलला शिक्षणाचा भार

शेतकऱ्याची मुले दत्तक; उचलला शिक्षणाचा भार

पुसेगाव : कर्जाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या खटाव तालुक्यातील मांजरवाडी येथील शेतकऱ्याच्या निराधार कुटुंबीयांना शिवसेनेने यंदाचा दहीहंडी कार्यक्रम रद्द करून आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तसेच शेतकऱ्याच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. खटाव तालुका शिवसेनेचा हा उपक्रम अन्य राजकीय संघटना तसेच विविध उत्सव साजरे करणाऱ्या विविध तरुण मंडाळांसाठीही प्रेरणादायी आहे.
गेली दोन वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे जेरीस आलेल्या मांजरवाडी येथील दत्तात्रय काशिनाथ भोसले या शेतकऱ्याने ९ मे २०१६ रोजी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.
पतीच्या मृत्यूनंतर या शेतकऱ्याची पत्नी, दोन मुलांसह अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. या कुटुंबाला अर्थसाह्य मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे मदतीची लेखी विनंती केली होती. पण, याबाबत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
सध्या हे कुटुंबीय अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे खटाव तालुका प्रमुख प्रताप जाधव तसेच अंकुशराव पाचांगणे, विनोद कदम, रणजित पवार, सुमित्रा शेडगे, महिपतराव डंगारे, सूरज जाधव, वैभव जाधव, अमित म्हात्रे व दिनेश देवकर यांनी मांजरवाडी येथे जाऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. तसेच गोकुळाष्टमीला शिवसेनेतर्फे पुसेगाव येथे दरवर्षी दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आयोजित करून हंडी फोडणाऱ्या मंडळांना मोठी बक्षिसे दिली जातात. पण, या कुटुंबाची स्थिती पाहून यावर्षीचा २५ आॅक्टोबरला आयोजित केलेला दहीहंडीचा उपक्रम साजरा न करता त्यासाठी जमलेली सर्व रक्कम या कुटुंबाला अर्थसाह्य म्हणून देण्याचा निर्णय प्रताप जाधव यांनी जाहीर केला.
यावेळी या शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांना शिवसेनेतर्फे शैक्षणिक साहित्य, कपडे देण्यात आले तसेच या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Farmer's children adopt; Loads of education