सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ‘व्हाया व्हाया’ निरोप आल्यानेच महायुतीचा घोटाळा, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठा

By दीपक देशमुख | Updated: February 13, 2026 15:58 IST2026-02-13T15:56:10+5:302026-02-13T15:58:42+5:30

विधानसभेवेळी थेट बोलले मग जिल्हा परिषदेला काय झालं ?

Excitement over the role of senior leaders in the Mahayuti in Satara Zilla Parishad government formation | सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ‘व्हाया व्हाया’ निरोप आल्यानेच महायुतीचा घोटाळा, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठा

सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ‘व्हाया व्हाया’ निरोप आल्यानेच महायुतीचा घोटाळा, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठा

दीपक देशमुख

सातारा : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी महायुतीच्या बैठकांना भाजपचे मंत्री आले नसल्याचा ठपका शिंदेसेनेकडून ठेवला जात आहे. मात्र, विधानसभेवेळी पालकमंत्री थेट आमच्या मंत्र्यांशी बोलले. पण, जिल्हा परिषदेवेळी मात्र दुय्यम नेत्यांमार्फत बैठकांचे निरोप पाठवल्याचे भाजप कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही थेट बाेलावले असते तर अडचण नव्हती. व्हाया - व्हाया निरोप आल्याने घोटाळा झाल्याचे सांगत एकप्रकारे त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपला दूर ठेवण्याची रणनिती आधीपासूनच असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजपने शत-प्रतिशतची तयारी सुरू केल्याची चर्चा होती. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार)चे रामराजे नाईक - निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर गोपनीय भेट झाली. त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही निवडणूक एकत्रित लढवण्याच्या अनुषंगाने खलबते सुरू होती. ही सर्व खलबते झाल्यानंतर महायुतीसाठी बैठकांसाठी बोलावणे आल्याचे भाजप कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. त्यातही बैठकांचा प्रोटोकॉल असतो. माध्यमांवरील चर्चा किंवा दुय्यम नेत्यांकडून आलेल्या निरोपांवर मंत्री बैठकांना जात नाहीत, असे काही कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत.

वाचा: जिल्हा परिषदेसाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

त्यामुळे भाजपला बाजूला ठेवण्याची रणनिती आखून शिंदेसेना - राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेचे रणमैदान जिंकले आहे. आता सत्तावाटपात भाजपला महायुतीचे हे दोन्ही मित्रपक्ष सहभागी करून घेणार काय? याची उत्सुकता लागली आहे.

पालकमंत्र्यांचे भाजप नेत्यांकडे बोट

शिंदेसेनेकडून महायुतीसाठी बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्या बैठकांना भाजपचे कोणतेच मंत्री जिल्ह्यात असूनही आले नाहीत, असा आरोप करत तिसऱ्यांदा तोंडावर पडायचे नसल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. तथापि, राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला व आम्ही एकत्रित निवडणूक लढवली असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

शिवेंद्रसिंहराजेंकडून इन्कार

महायुतीसाठीच्या बैठकीला बोलावणे आल्याचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यमांसमोर इन्कार केला आहे. आम्हाला थेट निरोप आला नाही. व्हाया - व्हाया (कोणाच्या तरी माध्यमातून) असे निरोप आल्यानेच हा घोटाळा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप संख्येने जरी मोठा पक्ष असला तरी देसाई हे मोठे नेते आहेत. त्यांच्या हातात हात द्यायलाच काय आम्ही तर अलिंगन द्यायला तयार असल्याचे सांगितले.

वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठा

जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीशिवाय अशक्य आहे. शिवाय राज्यात चौखूर उधळलेला भाजपचा वारू साताऱ्यात रोखला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषदेत भाजपला सहभागी करून घेणार काय, भाजपच्या नेत्यांच्या मुत्सद्देगिरीला यश मिळणार काय, याची उत्कंठा लागली आहे.

Web Title : सतारा जिला परिषद सत्ता संघर्ष: अप्रत्यक्ष संचार से गठबंधन में मतभेद।

Web Summary : सतारा जिला परिषद में सत्ता हथियाने से गठबंधन में तनाव। बीजेपी का आरोप है कि अप्रत्यक्ष संचार से उन्हें बाहर रखा गया। वरिष्ठ नेताओं के फैसले का इंतजार।

Web Title : Satara Zilla Parishad power struggle: Alliance discord due to indirect communication.

Web Summary : Satara Zilla Parishad's power grab sees alliance tensions. BJP alleges indirect communication led to exclusion. Senior leaders' decision awaited.