महायुती की आघाडी.. सातारा जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार?, उद्या होणार अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:26 IST2026-03-19T19:25:44+5:302026-03-19T19:26:36+5:30
काँग्रेसच्या सदस्याची राष्ट्रवादीला साथ : स्वाभिमानीच्या सदस्याकडून स्वतंत्र गटाची नोंदणी

महायुती की आघाडी.. सातारा जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार?, उद्या होणार अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड
प्रमोद सुकरे
कराड : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी (दि. २०) होणार आहे. स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला नसतानाही भाजप नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. तसेच मित्रपक्षातील राष्ट्रवादी-शिंदेसेनेने भाजपला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेसाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर नेमकी सत्तेची गुढी कोण उभारणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
खरंतर सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षांतच दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. प्रचारादरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये मिठाचा खडा पडला. त्यामुळे राज्यात सत्तेत एकत्रित असलेल्या महायुतीतील जिल्ह्यातील नेत्यांचा मेळ बसताना दिसत नाही.
भाजपचे नेते मंत्री जयकुमार गोरे यांनी निकालानंतर लगेचच जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा होईल, असा दावा केला. त्यामुळे मित्रपक्षांनी ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती घेतली. त्याचाच भाग म्हणून जवळजवळ महिनाभरापासून राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे सदस्य सहलीवर आहेत. आता शुक्रवारी हे सगळे साताऱ्यात येतील, पण त्यावेळी नेमकं काय होणार? सत्तेची गुढी कोण उभारणार? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
आघाडीचीही त्यांना साथ...
सहलीवर असलेल्या राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या सदस्यांसोबत आता कराडच्या काँग्रेसच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्यही सहभागी झाल्या आहेत. सुरुवातीपासूनच सोबत असलेल्या स्वाभिमानीच्या एकमेव सदस्यानेही स्वतंत्र गटाची नोंद मध्यंतरी एकदा सातारला येऊन केली. त्यामुळे या निवडीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
सदस्य थंड हवेच्या ठिकाणी...
गेला महिनाभर कर्नाटक-गोवा राज्यांत फिरत असलेले राष्ट्रवादी व शिंदेसेनेचे सदस्य सोमवारी महाराष्ट्र राज्यात परतले आहेत. सध्या ते एका थंड हवेच्या ठिकाणी असल्याचे सांगितले जात आहे. आता गुढीपाडव्याच्या पोळ्यांवर ते याच ठिकाणी ताव मारतील, अशी परिस्थिती आहे.
रात्र वैऱ्याची आहे...
शुक्रवारी (दि. २०) सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. या निवडीमध्ये आता एक रात्र आहे. हीच रात्र सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच नेत्यांना वैऱ्याची वाटू लागली आहे. आपले सदस्य कोणत्याही परिस्थितीत प्रलोभनांना बळी पडू नयेत, याची काळजी ते घेत आहेत. शिवाय त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ नये, यासाठी त्यांचे भ्रमणध्वनी काढून घेण्यात आल्याचे खात्रीशीर समजते.
दोन उपाध्यक्ष? आश्चर्य नको...
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडताना पक्षीय समतोल तर नेते सांभाळतीलच. पण त्याचबरोबर भौगोलिक समतोल सांभाळताना जिल्हा परिषदेत दोन उपाध्यक्ष झाले, तर आश्चर्य वाटायला नको, अशीही चर्चा महायुतीतील मित्रपक्षांच्या गोटात आहे.