Satara: फलटणच्या "यशवंत बँक" घोटाळा प्रकरणी अनेकांना ‘ईडी’च्या नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:28 IST2026-01-09T13:27:38+5:302026-01-09T13:28:06+5:30
१५ ते २० जानेवारी दरम्यान ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावण्यात आले

Satara: फलटणच्या "यशवंत बँक" घोटाळा प्रकरणी अनेकांना ‘ईडी’च्या नोटीस
सातारा : फलटण येथील यशवंत सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी काही दिवसापूर्वीच ईडीच्या पथकाने फलटण, कराड, सातारा येथे संस्थेच्या शाखेमध्ये छापे टाकत चौकशी केली होती. याप्रकरणी एकाला अटक करून त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी संस्थेचे काही कर्मचारी व कर्जदारांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा ईडीने बजावल्या आहेत. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
फलटण येथील यशवंत सहकारी बँक अडचणीत आल्यानंतर सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी ही बँक हस्तांतरित करून चालवायला सुरुवात केली होती. मात्र आता या बँकेतच आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची तक्रार ठेवीदार संघटनेच्या वतीने सहकारी निबंधकांसह ईडीकडे देखील करण्यात आली होती.
या तक्रारीची दखल घेत काही दिवसांपूर्वी ईडीच्या पथकाने फलटण, सातारा, कराड येथील संस्थेच्या शाखेत छापे टाकत चौकशी केली होती. त्यानंतर एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली होती. त्यामुळे वातावरण भलतेच तापले आहे. त्यातच गुरुवारी बँकेशी संबंधित काही कर्मचारी व काही कर्जदार यांना ईडीच्या नोटीस हातात मिळाल्या असून त्यांना १५ ते २० जानेवारी दरम्यान ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. त्यामुळे सहकारी संस्था वर्तुळात याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.