सातारकरांनो पाणी जपून वापरा, उन्हामुळे कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 16:08 IST2022-05-13T16:07:33+5:302022-05-13T16:08:12+5:30
वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार.

सातारकरांनो पाणी जपून वापरा, उन्हामुळे कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. गतवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कासचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.
सध्या मागील महिन्यापासून जुना व्हॉल्व्ह ऑपरेट न करता सध्या नवीन लाईन सुरू केल्याने शेवटपर्यंतचा एकच नवीन व्हॉल्व्ह सुरू राहणार आहे. गतवर्षी मे महिन्याच्या पंधरवड्यात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक होता. सद्यस्थितीत तलावात दहा फूट पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीपेक्षा एका फुटाने अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.
सद्यस्थितीला तलावात केवळ दहा फूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. दोनवेळा झालेल्या अवकाळी पावसाने कास तलावाच्या पाणीपातळीत दोन ते तीन इंच वाढ झाली. परिसरात उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.
दिवसेंदिवस पाणीपातळी खालावतेय...
शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दिवसाला तलावातील पाणीपातळी सव्वा ते दीड इंचाने कमी होत आहे. तलावातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असून, काही ठिकाणी पात्रातील जमिनीदेखील उघड्या पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणीपातळी खालावतच चालली आहे.
सध्या कास तलावात दहा फूट पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा एका फुटाने पाणीसाठा जरी जास्त असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. -जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव