Satara: कडकडीत शिरवळ बंदमुळे जनजीवन विस्कळीत; आतिशचे तीन मारेकरी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:09 IST2025-12-30T17:08:35+5:302025-12-30T17:09:47+5:30
खून झालेल्या तरुणाचा मृतदेह पोलिस ठाण्यात

Satara: कडकडीत शिरवळ बंदमुळे जनजीवन विस्कळीत; आतिशचे तीन मारेकरी गजाआड
शिरवळ : शिरवळ येथील आतिश अशोक राऊत (वय २३, रा. जुनी माळआळी, शिरवळ) याला मध्यरात्री पळशीसह विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. खुनाच्या घटनेने शिरवळकर नागरिक संतप्त झाले. त्यांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या शिरवळ बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंभर टक्के दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान, शिरवळ पोलिसांनी तीन जणांना अटक केले आहे.
शिरवळ येथील आतिश राऊत याला पळशी येथील तेजस भरगुडे व दीपक भरगुडे यांच्यासह काही युवकांनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर अपघात दाखविण्याचा बनाव रचण्यात आला. गंभीर जखमी आतिश राऊत याचा पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे शिरवळमध्ये संतापाची लाट उसळली होती. यावेळी शिरवळ पोलिसांनी अशोक राऊत यांच्या फिर्यादीनंतर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बारा तासांत तेजस बाळासाहेब भरगुडे (वय ३४), दीपक बाळासाहेब भरगुडे (३२, दोघे रा. पळशी, ता. खंडाळा), हृषीकेश जगन्नाथ मळेकर (२८, रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा) यांना अटक केली. खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने बुधवार, दि. ७ जानेवारीपर्यंत नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सातारा व शिरवळ पोलिसांचे तपास पथक विविध ठिकाणी रवाना केली आहेत. या घटनेची शिरवळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के तपास करीत आहेत.
तीन ते चार महिन्यांपूर्वीही मारहाण ?
आतिश राऊत याचा पळशी येथील युवकांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये मृत आतिश राऊत याला यापूर्वीही मारहाण केली असून तो अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सध्या शिरवळ परिसरात जोरात सुरू आहे. आरोपी शिरवळ पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर यामागचे कारण स्पष्ट होणार असून लवकरात लवकर उलगडा करण्याचे आवाहन शिरवळ पोलिसांपुढे आहे.
पोलिस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप
आतिश राऊत याच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्यानंतर शिरवळ ग्रामस्थांनी शिरवळ बंदची हाक दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शविला. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मृत्यू प्रकरणातील आरोपींना कडक शासन करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात शिरवळ ग्रामस्थ जमल्याने व मृतदेह पोलिस स्टेशन याठिकाणी आणल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के, शिरवळ पोलिसांनी तपासाबाबत माहिती देत समजूत काढल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळत शिरवळ येथील वैकुंठ स्मशानभूमी याठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिरवळ पोलिस ठाणे व शिरवळ याठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शिरवळ पोलिसांनी समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला.