लिंब खिंड 'आयटी पार्क'साठी ड्रोन सर्वेक्षण, सातारा जिल्ह्यातील युवकांच्या आशा पुन्हा पल्लवित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:13 IST2025-08-30T17:12:15+5:302025-08-30T17:13:07+5:30
तब्बल ४२ हेक्टरमध्ये प्रकल्प

लिंब खिंड 'आयटी पार्क'साठी ड्रोन सर्वेक्षण, सातारा जिल्ह्यातील युवकांच्या आशा पुन्हा पल्लवित
सातारा : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सातारा आयटी पार्कबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. शुक्रवारी प्रस्तावित आयटी पार्कसाठी नागेवाडी, लिंब खिंड येथील ४२ हेक्टर जागेचा एमआयडीसीकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेचा अहवाल एमआयडीसीकडून प्राप्त झाल्यानंतर शासन अधिसूचना काढणार आहे. यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील हजारो तरुण पुण्यात नोकरीसाठी स्थायिक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण झाला पाहिजे, यासाठी आयटी पार्कची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र शासनाकडे, तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मंत्री सामंत यांनीही त्यासाठी एप्रिल २०२५ मध्ये लिंब खिंडीत आयटी पार्क सुरू होईल, अशी ग्वाही साताऱ्यात एका कार्यक्रमात दिली होती. यासाठी जागेची अडचण होती, त्यावर महसूल विभागाची लिंब खिंड येथे असलेली सुमारे ४२ हेक्टर जागेचा पर्याय समोर आला.
ही मोठी जागा राष्ट्रीय महामार्गानजीक असल्यामुळे सोयीस्कर आहे. यामुळे याठिकाणी आयटी पार्क व्हावे, अशी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न सुटला. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू झाली.
शुक्रवारी (दि. २९) या जागेचे ड्रोन सर्व्हेक्षण करण्यात आले. आता अधिसूचना निघण्याची प्रतीक्षा आहे. अधिसूचना मिळताच हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर साताऱ्यात आयटी पार्कच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळेल. साताऱ्यात आयटी उद्योगाची दारे खुली होणार असल्यामुळे तरुणाईत उत्साहाचे वातावरण आहे.
नामांकित कंपन्या येण्याची गरज
आयटी पार्क होत असताना याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, या अनुषंगाने मोठ्या नामांकित कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची गरज आहे. यासाठी आयटी हबला आवश्यक असे पोषक वातावरण, पायाभूत सुविधा, त्याठिकाणी उपलब्ध करण्याची गरज आहे.
लिंब खिंडीतील ४२ हेक्टर जागेचा ड्रोन सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. सर्व्हेचा अहवाल एमआयडीसी मुख्यालयाकडून प्रस्ताव उद्योग विभागाकडे सादर केला जाईल. उद्योग विभागाकडून अधिसूचना काढल्यानंतर एमआयडीसीमार्फत आयटी पार्कसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारल्या जातील. - अमितकुमार सोंडगे, एमआयडीसी, प्रादेशिक अधिकारी
प्रकल्पामुळे साताऱ्यातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी पुणे-मुंबईकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात. आयटी प्रकल्पामुळे यास मोठा हातभार लागेल. तसेच कन्व्हेंशन सेंटर उभारणीचाही प्रस्ताव देण्यात येईल. - शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री