राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले..
By नितीन काळेल | Updated: May 22, 2025 18:31 IST2025-05-22T18:31:00+5:302025-05-22T18:31:34+5:30
रामराजेंबरोबर संवाद; परत येण्याविषयी चर्चा सुरू

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले..
सातारा : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा नाही. एकत्र येण्याबाबतही संभवना वाटत नाही. आम्ही एनडीए बरोबर ठाम राहणार आहोत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याबाबत तीन्ही पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. तसेच रामराजे नाईक-निंबाळकर आणि माझ्यात फोनवरुन संवाद होतो. त्यांच्या परत येण्याविषयी चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा येथे पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, आमदार सचिन पाटील, सरचिटणीस निवास शिंदे आदी उपस्थित होते. पक्ष मेळाव्यासाठी आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.
तटकरे म्हणाले, २०१४ पासून आमच्यात भाजपबरोबर जाण्याचा प्रवाह होता. नेतृत्वाचीही संमती होती. पण, पुढे तसे काही होऊ शकले नाही. मात्र, २०२३ मध्ये एनडीएबरोबर गेलो. हा निर्णय योग्य ठरला आहे. राज्यात सत्तेवर आलो असून महाराष्ट्राला गती देण्याचे काम करणार आहोत. यासाठीच पक्षाची पुर्नबांधणी करत असून ताकद वाढवली जाणार आहे.
..योग्यवेळी तीन्ही पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही न्यायालयाने दिलेल्या मुदतीत होतील. प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी असते. तरीही निवडणुकीबाबत योग्यवेळी महायुतीतील तीन्ही पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.
रामराजे परत येण्याविषयी चर्चा
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याबाबतच्या प्रश्नांबाबत ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मनात वेगळी भूमिका होती. एेनवेळी सचिन पाटील आले आणि आमदारही झाले. हा घड्याळाचा करिश्मा आहे. यासाठी भाजपच्या माढ्याच्या माजी खासदारांचीही मदत झाली. विधान परिषदेत रामराजे हे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माझा आणि त्यांचा फोन होतो. ते परत येण्याविषयी चर्चा सुरू आहे.
मंत्री भरत गोगावले यांना टोला..
रायगडचे पालकमंत्रीपद मलाच मिळणार म्हणून भरत गोगावले दावा करतात. तसेच शिंदेसेनेचेही जादा आमदार जिल्ह्यात आहेत, असे सांगण्यात येते, असा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर तटकरे यांनी पालकमंत्रीपदाबाबत विलंब झालाय असे स्पष्ट करतानाच मी एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि त्यातच रायगड जिल्ह्यातील असल्याने माझी तटस्थपणाची भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. तसेच आमदारांची आकडेवारी मला पाठ आहे, असेही सांगून त्यांनी मंत्री गोगावले यांना एकप्रकारे टोलाच लगावला.
वैष्णवी हगवणे आत्महत्येबाबत म्हणाले, नराधमांना ठेचून काढा..
राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या घरातील वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर तटकरे यांनी हगवणे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत. त्यांचं निलंबन केलंय. याबाबत सखोल चाैकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. अशी नराधम प्रवृत्ती ठेचून काढायला हवी, असेही ठामपणे सांगितले.