शेतकऱ्यांसाठी ‘रिपाइं’चे भीक मांगो आंदोलन

By Admin | Updated: November 24, 2015 00:26 IST2015-11-23T22:48:34+5:302015-11-24T00:26:41+5:30

कुसुंबी-कोळघर रस्ता बेकायदा उत्खननप्रकरणी ठेकेदारावर फौजदारीची मागणी

Demand for the people of 'RPI' movement for farmers | शेतकऱ्यांसाठी ‘रिपाइं’चे भीक मांगो आंदोलन

शेतकऱ्यांसाठी ‘रिपाइं’चे भीक मांगो आंदोलन


कुडाळ : कुसुंबी-कोळघर रस्त्याच्या बेकायदेशीर झालेल्या उत्खननाबद्दल ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी जावळी तालुका रिपाइंच्या वतीने सोमवारी मेढ्याच्या आठवडा बाजारात भीक मांगो आंदोलन केले. भीक तहसीलदार रणजित देसाई यांच्या टेबलावरच ठेवल्याने गोंधळ उडाला.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिकचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो भीमसैनिक व बाधित शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांसाठी बाजारात भीक मागितली. या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाने मात्र बाजारकरांची चांगलीच करमणूक झाली.
कुसुंबी-कोळघर रस्त्याच्या रुंदीपेक्षा केवळ पवनचक्क्यांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आले आहे. त्यात ठेकेदार, पवनचक्की मालक व अधिकाऱ्यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप संजय गाडे यांनी यावेळी बोलताना केला.
गाडे म्हणाले, ‘१४७ शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये गेल्या असून, त्यातील ४७ शेतकरी नवबौद्ध आहेत. मूळ ठेकेदार व मालकांनी या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले असून, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा गाडे यांनी तहसीलदारांसमोरच दिला. वेळ पडल्याच तहसीलदारांसमोर आत्मदहनही केले जाईल.’
तासभर चर्चा होऊनही ठोस निर्णय झाला नाही. तहसीलदार देसाई यांनी शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. (प्रतिनिधी)

तहसीलदारांच्या टेबलावर भिकेचे पैसे
आरपीआयचे कार्यकर्ते घोषणा देत बाजारात भीक मागत मागत तहसील कार्यालयात आले. तहसीलदारांनी त्यांना चर्चेसाठी आत बोलावल्यावर संजय गाडे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून टोपलीत मिळालेली भीक तहसीलदारांच्या टेबलावरच ठेवली. तेव्हा तहसीलदार रणजित देसाई अवाक्च झाले. पोलीस पोलीस करत त्यांनी हे काय आहे, असं म्हटल्यावर पोलिसांनी पळत येऊन त्या टोपल्या गायब केल्या.

Web Title: Demand for the people of 'RPI' movement for farmers