ग्राउंड रिपोर्ट: वाटाणा सडला; शेतकरी रडला!, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका
By नितीन काळेल | Updated: September 4, 2025 15:59 IST2025-09-04T15:32:37+5:302025-09-04T15:59:08+5:30
रानाचं झालं तळं; पिकाचा चिखल; उत्पन्न शून्य

ग्राउंड रिपोर्ट: वाटाणा सडला; शेतकरी रडला!, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका
नितीन काळेल
सातारा : दरवर्षीच वाटाणा पीक घेतो. त्यातच महाबळेश्वरच्या वाटाण्याला मुंबईच्या बाजारातही चांगली मागणी. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते; पण यावर्षी सतत पाऊस असल्याने उगवणीलाच वाटाण्यात पाणी साचले. त्यातच अजूनही पाऊस सुरू असल्यानं जमिनीचं तळं अन् पिकाचा चिखल झालाय. त्यामुळे वाटाणा कुजल्याने उत्पन्न मिळणार नाहीच. यातून वर येण्यासाठी शासनानेच तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक आंब्रळ येथील शेतकरी दिलीप आंब्राळे यांनी दिली आहे.
महाबळेश्वर तालुका तसा डोंगर, चढ-उताराचा. तरीही येथील शेतकरी विविध पिके घेऊन समृद्ध होण्याची स्वप्ने पाहतात. येथील स्ट्राॅबेरी जशी प्रसिद्ध तसेच वाटाण्यालाही मागणी राहते. त्यामुळे शेतकरी वाटाणाही लावून मुंबईची बाजारपेठ गाठतात; पण यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात सतत पाऊस आहेच. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सतत तीन दिवस अतिवृष्टी झाली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये दिलीप आंब्राळे यांचाही समावेश आहे.
दिलीप आंब्राळे यांची एकूण १२ ते १३ एकर शेती आहे. यामध्ये ते स्ट्राॅबेरी पिकवतात. त्याचबरोबर वाटाणा हे पीकही घेतात. यावर्षीही त्यांनी वाटाणा घेतला; पण उगवणीलाच दणका बसला. त्यातून पुन्हा उभा राहणे शक्य नाही. कारण, सततचा पाऊस आणि पाणी साचल्याने वाटाणा खालील बाजूने कुजलाय. पाऊस कायम राहिल्यास पीक पूर्ण कुजणार आहे.
दिलीप आंब्राळे सांगत होते, यावर्षी दोन एकर वाटाणा केला होता. त्यासाठी १४० रुपये किलोने ८० किलो बियाणे आणले. लागवडीनंतर उगवणीलाच पाऊस सुरू झाला. दोन दिवस अतिवृष्टी झाली. जमिनीत पाणी साचले. त्यातच आताही सतत पाऊस पडतोय. त्यामुळे वाटाणा बघायला गेलो तर खालून सडू लागल्याचे दिसत आहे. आता वाटाणा हाती येणारच नाही. त्यामुळे माझ्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.
दरम्यान, ही व्यथा एकट्या दिलीप आंब्राळे यांची नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे. यासाठी पंचनामे झालेल्या क्षेत्रासाठी लवकर मदत शासनाकडून मिळावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीचा १९९ शेतकऱ्यांना फटका; त्यामधील ११२ महाबळेश्वरमधील..
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सातारा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले. प्रशासनाकडील नोंदीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९ आहे. यामधील ११२ शेतकरी हे महाबळेश्वर तालुक्यातील आहेत.
यावर्षी सतत पाऊस आहे. वाटाण्याला फटका बसला. त्यामुळे उत्पन्नाची आशा संपलेली आहे. तसेच आता पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवडही काही दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याचा स्ट्राॅबेरीच्या उत्पादनावर परिणाम होईल. सततच्या पावसामुळे यावर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. - दिलीप आंब्राळे, शेतकरी